WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण पंचायत समितीवर ‘त्रिशंकू’ कौल!


चिपळूण पंचायत समितीवर ‘त्रिशंकू’ कौल!

राष्ट्रवादी–युती समसमान, उबाठा ठरणार किंगमेकर

चिपळूण : तालुक्यात झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता सत्तासंघर्ष अधिक चुरशीचा केला असून, पुढील सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पंचायत समिती : राष्ट्रवादी–युती समसमान, उबाठा निर्णायक भूमिकेत

चिपळूण पंचायत समितीच्या एकूण १८ गणांमध्ये पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे स्पष्ट झाले आहे —
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ७
शिवसेना (शिंदे गट) – ४
भाजप – ३
शिवसेना (उबाठा) – ४

राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना–भाजप–आरपीआय युती या दोन्ही आघाड्यांकडे समान ७ जागा आल्याने पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत कुणालाही मिळालेले नाही. परिणामी शिवसेना उबाठा गटाच्या ४ जागा निर्णायक ठरणार असून, सत्ता स्थापनेची चावी त्यांच्याच हातात गेल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीची स्वतंत्र लढत; प्रचाराशिवायही मोठे यश

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कोणतीही मोठी प्रचारसभा न घेता, अतिशय साध्या पद्धतीने निवडणूक लढवूनही राष्ट्रवादीने ७ जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली.“राष्ट्रवादीचाच सभापती बसेल” अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली असून, या भूमिकेला मान्यता देणाऱ्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली जाईल, असे संकेत दिले आहेत.

उबाठाची ताकद वाढली; भास्कर जाधवांचे नेतृत्व प्रभावी

पंचायत समितीत शिवसेना उबाठा पक्षाने ४ जागा मिळवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या जागा सत्तासमीकरणात निर्णायक ठरणार असल्याने, राष्ट्रवादी–उबाठा युतीची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

जिल्हा परिषद : ९ जागांमध्ये सत्तासंतुलन

चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांमध्ये निकाल पुढीलप्रमाणे लागले —
शिवसेना (शिंदे गट) – ३
भाजप – २
शिवसेना (उबाठा) – १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ३
जिल्हा परिषदेतही कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट वर्चस्व मिळालेले नाही.

खेर्डी–कळवंडेत राष्ट्रवादीला मोठा धक्का

खेर्डी व कळवंडे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांना मोठा राजकीय धक्का बसला. या गटात शिवसेना–भाजप–आरपीआय (आठवले) युतीचे वर्चस्व राहिले असून, राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नाही. खेर्डी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माजी सदस्या दिशा दाभोळकर, तसेच पंचायत समिती गणातील माजी सदस्य नितीन उर्फ अबू ठसाळे यांचा पराभव झाला.जिल्हा परिषदेत भाजपचे रावी सतीश मोरे, तर पंचायत समितीत भाजपचे विनोद भुरण विजयी ठरले. खेर्डीतील गेली अनेक वर्षांची राष्ट्रवादीची सत्ता भाजप –शिवसेना युतीकडे गेली आहे.

अलोरेत ‘झगडे दाम्पत्याची कमाल’
अलोरे पंचायत समिती गण व अलोरे जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाचे माजी बांधकाम सभापती विनोद झगडे व पत्नी विनया झगडे या दोघांनीही विजय मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली.

हाय व्होल्टेज लढती ठरल्या लक्षवेधी
शिरगाव पंचायत समिती गण – भाजपच्या ऍड. नयना पवार व राष्ट्रवादीच्या स्नेहा साळवी यांच्यात कांटे की टक्कर; अखेर साळवी कुटुंबाचे वर्चस्व कायम.

वहाळ जिल्हा परिषद गट – शिवसेना शिंदे गटाच्या शिवानी सावंत यांनी उबाठा गटाच्या पूर्वा जाधव यांचा पराभव करत विजय मिळविला.

सावर्डे जिल्हा परिषद गट – राष्ट्रवादीच्या माजी सभापती पूजा निकम यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत माजी शिवसेना शिंदे गटाच्या सभापती धनश्री शिंदे यांना धक्का दिला.

कापसाळ (अनुसूचित जाती आरक्षण) – शिवसेना उबाठाचे उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष संभाजी जाधव विजयी.

पुढील सत्ता कुणाची? चिपळूणचे लक्ष लागले
पंचायत समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने पुढील सत्तास्थापनेसाठी राजकीय खेळी वाढणार आहेत.राष्ट्रवादी–उबाठा युती होणार की शिंदे गट–भाजप–आरपीआय युतीसह राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार याबाबत चिपळूणवासियांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुका शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी विशेष परिश्रम घेतले.
चिपळूणच्या राजकारणात पुढील काही दिवस सत्तासमीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत चिपळूण पंचायत समिती गणात राष्ट्रवादी-अजित पवार गटाच्या मेघा इंगवले (दळवटणे गण), सूर्यकांत खेतले (वेहेळे), स्नेहा साळवी (शिरगाव), शौकत माखजनकर (सावर्डे), शरद शिगवण (मांडकी), उज्ज्वला घाग (कोकरे), मनस्वी बैकर (कुटरे), शिवसेना – शिंदे गटाच्या पूजा जवरत (भोम), संदेश आयरे (पेढे), विनोद झगडे (अलोरे), संजय जावळे (वहाळ), भाजपच्या सायली वाजे (कळवंडे), विनोद भुरण (खेर्डी), सुप्रिया देवरुखकर (पिंपळी खु.), शिवसेना-ठाकरे गटाचे सुभाष संभाजी जाधव (कापसाळ), गौरव पाटेकर (उमरोली), सुप्रिया वंजारे (गुढे), संजीवनी खापरे (निवळी) निवडून आले आहेत.

जिल्हा परिषद गटात (चिपळूण तालुका) शिवसेना शिंदे गटाच्या मयुरी शिर्के (कळवंडे गट), शिवानी संदीप सावंत (वहाळ), विनया विनोद झगडे (अलोरे), भाजपच्या दीप्ती दीपक महाडिक (पेढे), रावी सतीश मोरे (खेर्डी), शिवसेना उबाठा गटाचे प्रमोद सुरेश निवळकर (उमरोली), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेहा सुरेश रहाटे (शिरगाव), पूजा शेखर निकम (सावर्डे), संजय राजाराम कदम (कोकरे) यांनी विजय मिळावला

मतमोजणीसाठी सर्वच पक्षातील पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तुफान गर्दी केली होती. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळून, विजयी मिरवणुकीसह आनंदोत्सव साजरा केला. मतमोजणी कालावधीत चिपळूण शहरातील चिंचनाका ते बहादूरशेख नाका रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तर चोख पोलीस बंदोबस्तही तैनात होता.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!