रामाच्या नावावर सत्ता… आता राम मंदिरातच चोरी?
🔴रामपूर येथे शिवसेना उबाठाचे ‘राम रक्षा आंदोलन’
🔴आमदार भास्करराव जाधव यांचा भाजपवर घणाघात
चिपळूण, दि. २९ : अयोध्येतील राम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘राम रक्षा आंदोलन’ अंतर्गत चिपळूण तालुक्यातील रामपूर-गुढे फाटा येथील श्रीराम मंदिरात बुधवारी आंदोलन करण्यात आले. नेते व आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत श्रीरामाची आरती, जयघोष आणि घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपवर जोरदार टीका करत भास्करराव जाधव यांनी अनेक गंभीर आरोप केले.

भाषणात बोलताना आमदार जाधव म्हणाले की, “हिंदूंना बदनाम करू नका, असे सांगणारेच आज उत्तर द्यावे की राम मंदिरातील चोऱ्या नेमक्या कोणी केल्या? त्या पाकिस्तानातून कोणी येऊन केल्या नव्हत्या. ‘चोर मचाये शोर’ या म्हणीप्रमाणे स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप आता आरडाओरडा करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राम मंदिरासाठी देशभरातून हिंदूंनी मोठ्या श्रद्धेने देणग्या दिल्या. मात्र, “देणग्या घेताना श्रद्धा आणि आस्था पाहिली गेली नाही, पण चोरीचा प्रश्न उपस्थित झाला की वेगळी भाषा बोलली जाते,” असा दावा त्यांनी केला. चंपत राय व मिश्रा यांच्यासह मंदिराशी संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप करत “चौकीदारच चोर निघाले. जमिनीचे घोटाळे झाले आणि सर्व बाजूंनी लूट झाली,” असेही त्यांनी म्हटले.
राम मंदिर उभारणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपने घराघरातून विटा आणि ‘राम खिचडी’च्या नावाखाली धान्य गोळा केले होते. मात्र ते मंदिरापर्यंत कधीच पोहोचले नाही, असा आरोप करत “चोरी करण्याची सवय पहिल्या दिवसापासूनच होती,” अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो, मात्र खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी कणखर भूमिका घेण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले, असा दावा त्यांनी केला. “राम मंदिरासाठी अध्यादेश काढला नाही म्हणून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपने १९९६ ते २००४ या काळात केंद्रात सत्ता असताना स्वतः अध्यादेश का काढला नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपवर आणखी हल्लाबोल करताना जाधव म्हणाले, “भाजपने इतरांचे पक्ष फोडले, आमदार-खासदार पळवले, देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आणि शेवटी प्रभू श्रीराम यांच्या नावावर राजकारण करत राम मंदिरातही गैरव्यवहार घडले,” असा आरोप त्यांनी केला.
अयोध्येतील राम मंदिरासाठी केवळ हिंदूंनीच नव्हे, तर सर्व धर्मीय नागरिकांनी तसेच काँग्रेससह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही देणग्या दिल्या होत्या. त्यातून मोठा निधी जमा झाला. मात्र मंदिराच्या भूमिपूजनापासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि ध्वजारोहणापर्यंतचे सर्व कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, तर देशाच्या राष्ट्रपतींनाही निमंत्रण देण्यात आले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
या आंदोलनावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, उपतालुकाप्रमुख संदीप चव्हाण, महिला आघाडी संघटक सुशीला पवार, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वंजारे, वर्षा चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विभागप्रमुख संदीप घाग, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निंबाळकर, गौरव पाटेकर, प्रीतम वंजारे, मंगेश गुढेकर आणि स्थानिक शिवसैनिकांनी आंदोलनाच्या आयोजनाची धुरा सांभाळली. परिसरातील मोठ्या संख्येने रामभक्त नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.











