‘नोटा’ने वेधले लक्ष
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना ना पसंती दर्शवीत नोटाला मतदान केले आहे. यामध्ये ९ जिल्हा परिषद गटामध्ये १ हजार ३६९ तर पंचायत समितीच्या १८ गणात २ हजार १२१ मते नोटाला पडली आहेत. यामध्ये पेढे जिल्हा परिषद गट आणि शिरगांव पंचायत समिती गणात नोटाला झालेले मतदान संबंधीत उमेदवारांना ‘भारी’ पडले आहे.
चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. पंचायत समितीसाठी कोणाही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले नाही. पंचायत समितीच्या १८ जागांपैकी शिवसेनेला ४, भाजपला ३, राष्ट्रवादी कॉंग्रेस ७ आणि ठाकरे सेनेला ४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने ठाकरे सेनेची भूमिका निर्णायक ठरली आहे. मात्र यानिवडणुकीत नोटाला झालेल्या मतदानाने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या ९ गटात १ हजार ३६९ तर पंचायत समितीच्या १८ गणात २ हजार १२१ मतदान झालेले आहे. पंचायत समितीला नोटांचे मतदान अधिक राहिले आहे. जिल्हा परिषदेसाठी वहाळ गटात तालुक्यात सर्वाधिक मतदान नोटाला झाले. या गटात २३६ मतदारांनी रिंगणात असलेल्या उमेदवारांना ना पसंती दर्शवली. पेढे गटात विजयी उमेदवार भाजपच्या दिप्ती महाडिक यांना ४ हजार ६२२ तर राष्ट्रवादीच्या सान्वी शिंदे यांना ४ हजार ४३१ मते मिळाली. सौ. महाडिक या १९१ मतांनी विजयी झाल्या. या गटात नोटाला १५६ मते पडली आहे, त्यामुळे येथे नोटाला झालेल्या मतांनी लक्ष वेधले आहे. तर पंचायत समितीसाठी तालुक्यात सर्वाधिक नोटाला मतदान पिंपळी खुर्द गणात झाले. मात्र या मतांनी तेथील उमेदवारांचे गणित बिघडलेले नाही. मात्र शिरगांव गणात नोटाला झालेल्या मतांनी मात्र गणित बिघडले आहे. शिरगांव गणातून राष्टवादीच्या स्नेहा साळवी यांना ३ हजार ३०५ मते तर विरोधी भाजपच्या अॅड. नयना पवार यांना ३ हजार १७० मते मिळाली. परिणामी साळवी या १३५ मतांनी विजयी झाल्या. मात्र या गणात नोटाला १६४ मतदान झाले आहे. त्यामुळे शिरगाव गणातील नोटाची मतेही लक्षवेधी अशीच ठरली असल्याचे दिसून येत आहे.












