WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आई-वडिलांना वाचवताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू


आई-वडिलांना वाचवताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

🔴खांदाटपाली येथील हृदयद्रावक घटना

🔴मेगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

🔴परिसरात शोककळा

चिपळूण, दि. २९ : तालुक्यातील खांदाटपाली (भुवडवाडी) येथे आई-वडिलांना विजेच्या धक्क्यातून वाचवण्याचा प्रयत्न करताना ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी घडली. अक्षय चंद्रकांत मेगे (वय ३१, रा. खांदाटपाली, भुवडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास अक्षय यांची आई चंद्रकला मेगे या घराच्या पडवीत वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पडवीत असलेल्या लोखंडी तारेमध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्यांना अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. त्याच ठिकाणी असलेल्या त्यांच्या पतीलाही विजेचा धक्का बसल्याची माहिती आहे.

आईच्या आरडाओरडाचा आवाज ऐकताच अक्षय मेगे यांनी तात्काळ पडवीकडे धाव घेतली. जमिनीवर पडलेल्या आईला वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्या लोखंडी तारेमध्ये वीज प्रवाह असल्याने अक्षय यांनाही तीव्र विजेचा धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.

अक्षय यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे संजय बाबू भुवड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अक्षय यांना त्वरित चिपळूण येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी ९.०५ वाजता डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अक्षय मेगे हे अविवाहित होते. ते घरांच्या बांधकामाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, मामा तसेच विवाहबद्ध झालेल्या बहिणी असा परिवार आहे.

आई-वडिलांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावलेल्या या उमद्या तरुणाच्या निधनाने खांदाटपाली (भुवडवाडी) परिसरावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!