WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण तालुक्यात 62 टक्के मतदान


चिपळूण तालुक्यात

62. 56 टक्के मतदान

ईव्हीएम बिघाडाने चिपळूण तालुक्यात मतदानाचा खेळखंडोबा

मतदारांचा संयम सुटला; अनेक केंद्रांवर तीन-तीन तास मतदान ठप्प

चिपळूण : तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असतानाच ऐन मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशिनच्या तांत्रिक बिघाडामुळे चिपळूण तालुक्यात अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बहुतांश मतदान केंद्रांवर मशिन बंद पडल्याने मतदार, अधिकारी व उमेदवारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मतदारांना त्यांना हक्क बजावता यावा यासाठी रात्री 8 वाजेपर्यंतची वेळ ईव्हीएम मशिन बंद पडलेल्या ठिकाणी देण्यात आली होती. उशिराने मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यात एकूण 62.56 टक्के मतदान झाले आहे.

चिपळूण तालुक्यात आज सर्वात अधिक चर्चेचा विषय ठरला तो ईव्हीएम मशिनचा! काही मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगेत उभे असलेले मतदार मतदान न करताच माघारी फिरले. “साहेब, मतदान यंत्र सुरू झाले का?हा एकच सवाल दुपारपर्यंत अनेक केंद्रांवर ऐकू येत होता. ज्या ठिकाणी मशिन बंद पडली होती, तेथे नवीन मशिन पोहोचवताना व दुरुस्ती करताना प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाली. या संपूर्ण प्रकारावर आमदार शेखर निकम यांच्यासह उमेदवार व मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शनिवारी तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, याआधीच्या निवडणुकांच्या तुलनेत प्रथमच मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी मतदान प्रक्रिया वारंवार ठप्प झाली. अनेक ठिकाणी मतदारांना दीर्घकाळ ताटकळत उभे राहावे लागले.

कुडप, कळवंडे यांसारख्या केंद्रांवर तीन तासांहून अधिक काळ ईव्हीएम मशिन बंद होती. मशिन सुरू होत नसल्याने मतदानासाठी आलेले अनेक मतदार निघून गेले. काही ठिकाणी तीन तास मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याचे निराशाजनक चित्र दिसून आले. त्यामुळे दुपारी 1.30 वाजेपर्यंत तालुक्यात अवघे 38 टक्के, तर दुपारी 3.30 पर्यंत 50.47 टक्के मतदान नोंदले गेले. तर रात्री उशिराने मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण 62 टक्के मतदान झाले.

तालुक्यातील खेर्डी, सावर्डे कॉलनी, पिंपळी, कुडप, कापरे, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापसाळ, कळंबस्ते, कोंढे, कळवंडे, वहाळ, पेढांबे, सती–चिंचघरी, मालघर, शिरगाव, दोणवली आदी गावांतील एक-दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व झोनल अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. काही ठिकाणी राखीव मशिन पुरवण्यात आल्या, मात्र धक्कादायक बाब म्हणजे काही केंद्रांवर राखीव मशिनही बंद पडल्याचे आढळून आले.

मतदानासाठी आलेले अनेक चाकरमानी रेल्वे, एस.टी बस तसेच खासगी वाहनांनी गावी दाखल झाले होते. संबंधित उमेदवारांनी त्यांची ये-जा करण्याची व्यवस्था केली होती. मात्र मतदान यंत्रातील गोंधळामुळे अनेकांना मतदान न करताच परतीचा प्रवास करावा लागला. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांचीही मोठी दमछाक झाली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी माहिती दिली की, “चिपळूण तालुक्यातील 245 मतदान केंद्रांसाठी 10 टक्के अतिरिक्त मशिन ठेवण्याच्या सूचना असताना आम्ही 15 टक्के म्हणजेच 38 जादा मशिनची व्यवस्था केली होती. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला तपासणीदरम्यान 10 मशिनमध्ये बिघाड आढळला. मतदानाच्या दिवशी सकाळी मॉकपोल घेताना आणखी 18 मशिनमध्ये तांत्रिक अडचणी आढळून आल्या. त्यानंतर मतदान सुरू असतानाच सुमारे 50 केंद्रांवर अचानक मशिन बंद पडल्या. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कार्यालयातून 70 नवीन मशिन मागवून तातडीने पुरवठा करण्यात आला. ज्या केंद्रांवर बिघाड झाला, तेथेही मतदानाची टक्केवारी चांगली राहिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएम बिघाडामुळे मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा निवडणुकांमध्ये तांत्रिक यंत्रणेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत आहे.


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!