कोकणच्या राजकारणातील अजिंक्य पर्व : भास्करशेठ जाधव
कोकणच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, विकासाला नवी दिशा देणारे आणि सर्वसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांचा आज 1 ऑगस्ट रोजी जन्मदिन…
काही व्यक्ती केवळ राजकारण करत नाहीत, तर त्या एका विचाराचा, एका प्रवाहाचा आणि एका युगाचा चेहरा बनतात. भास्कर शेठ जाधव हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पाडला आणि विकासाचा नवा सूर्योदय घडवला.
१९९१ साली ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. गावोगावी नियोजनबद्ध पाणीपुरवठा योजना राबवून हजारो कुटुंबांचे जीवनमान बदलण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक माता-भगिनींच्या आयुष्यात सन्मान आणि दिलासा निर्माण झाला.
शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा माणूस, ट्रक चालकापासून आमदार, कॅबिनेट मंत्री, नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री या प्रवासापर्यंत पोहोचला. हा प्रवास केवळ पदांचा नव्हता; तो जिद्दीचा, कष्टाचा, सातत्याचा आणि लोकांच्या विश्वासाचा होता.
आजही वडिलोपार्जित शेतीशी त्यांचे असलेले नाते कायम आहे. शेतीचा वारसा जपण्याबरोबरच पुढील पिढीलाही त्या संस्कृतीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. आधुनिक राजकारणातही आपल्या मातीतली ओळख टिकवून ठेवणारे ते नेतृत्व आहे.
भास्कर शेठ जाधव यांची वक्तृत्वशैली ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची मोठी ताकद राहिली आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी चिपळूण तालुक्यात गावोगावी फिरून भगव्या विचारांचा प्रचार केला. त्यांची सभा म्हणजे विचारांची ज्वाला असायची. त्या काळात सोशल मीडियाचे माध्यम नव्हते; स्पीकरवरील भाषणातून त्यांनी हजारो तरुणांच्या मनात विचारांचे बीज रोवले.
अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती होती की मुलगा शिवसेनेत आणि वडील काँग्रेसमध्ये. मात्र विचारांच्या ताकदीने त्यांनी अनेक कुटुंबांचे राजकीय दृष्टिकोन बदलले. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला राजकारण समजावून सांगण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
भास्करशेठ जाधव यांचा जनसंपर्क हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुण आहे. प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांची नावे त्यांना आजही आठवतात. माणसे जोडण्याची ही कला फार थोड्या नेत्यांकडे असते.
माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आजही स्मरणात आहे. आमदारकीच्या निवडणुकीदरम्यान ते आमच्या कापरे गावात सभेसाठी आले होते. गावातील ज्येष्ठ काँग्रेस नेते भाऊराव मोरे (आबा मास्तर) यांच्या घरी ते स्वतः गेले. सर्वांना आश्चर्य वाटले. त्यावेळी त्यांनी आबा मास्तरांना सांगितलेले शब्द आजही कानात घुमतात – “मला तुमचे मत नको, तुमचा आशीर्वाद हवा आहे.” विरोधकांनाही सन्मान देण्याची त्यांची ही वृत्ती त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.
राजकारणात चढ-उतार येत असतात. सत्ता येते-जाते. पण भास्करशेठ जाधव यांचा जनसंपर्क आणि लोकांशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांतील कार्यकर्ते त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात. हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती आहे.
तुरंबव गावची ग्रामदैवत आई शारदा देवी यांच्यावरील त्यांची नितांत श्रद्धा सर्वश्रुत आहे. कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी ग्रामदैवताच्या उत्सवाला उपस्थित राहून परंपरा जपण्याचे कार्य ते सातत्याने करत आले आहेत. कोकणची लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्ये जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
भास्करशेठ जाधव हे केवळ एक राजकारणी नाहीत; ते संघर्ष, विकास, जनसंपर्क आणि लोकविश्वास यांचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून हजारो कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतकांची मोठी फळी निर्माण केली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करताना एवढीच प्रार्थना— आपल्या नावाप्रमाणेच आपण भास्करासारखे सदैव तळपत राहा. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेची अखंड ऊर्जा लाभो. पुन्हा एकदा विकासाच्या नव्या पर्वाचे नेतृत्व करण्याची संधी मिळो आणि आपल्या कार्यातून कोकणच्या प्रगतीचा नवा सूर्योदय घडो..
साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!













