संस्कृत प्रज्ञा शोध परीक्षेत भाविक कांबळी राज्यात प्रथम
चिपळूण : येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ व रवीकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या संस्कृत प्रज्ञा शोध परीक्षेत भाविक भूषण कांबळी याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या परीक्षेत शाळेतील इयत्ता दहावीचे एकूण ३४ विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व शाळा स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
भाविक कांबळी याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. कारदगे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे. त्याच्या कष्ट, सातत्य व संस्कृत विषयातील प्रावीण्यामुळे हे यश मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शाळेच्यावतीने भाविक कांबळी याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











