WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

गोवळकोटमधील आरक्षण रद्द प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक


गोवळकोटमधील आरक्षण रद्द प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

नगर परिषदेला निवेदन सादर, नगराध्यक्षांनी दिले आश्वासन

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील प्रायमरी स्कूल व मैदानासाठी शहर विकास आराखड्यात राखीव असलेल्या जागेवरील आरक्षण नगर परिषदेने रद्द करू नये, तसेच ही जागा नगर परिषदेने तातडीने विकसित करावी, अशी मागणी मंगळवारी ग्रामस्थांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेले निवेदनही देण्यात आले.

संबंधित निवेदन सादर करताना ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत हरवडे, विजय खापरे, दीपक निवाते, संदीप बांद्रे आदी उपस्थित होते. गोवळकोट स्वयंभू गणपती मंदिरा शेजारील जागा मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक १७०/३ब, शहर सर्वेक्षण क्रमांक ७८२, जे आरक्षण क्रमांक १५ आणि १६ प्रायमरी स्कुलसाठी राखीव अथवा आरक्षित आहे. मात्र या जामीनीचे मालक अस्मा अहमद खतीब व अहमद अन्वर खतीब यांनी संबंधित जागेतील आरक्षण रद्द करण्यासाठी अथवा जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी त्यांनी राज्याच्या नगर रचना विभागाकडे उच्च न्यायालयाच्या वकिलामार्फत अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जानुसार नगर परिषदेने जाहीर नोटीस बजावून याबाबत महिन्याच्या मुदतीत शहरातील नागरिकांना हरकती नोंदविण्याबाबत सूचना केली आहे. त्यावर काही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन याविषयी निवेदन दिले आहे.

यावेळी संबंधित जमीन मालक यांना नगर परिषदेने तातडीने व शक्य झाल्यास वाढीव दराने मोबदला द्यावा, मात्र गोवळकोट व परिसरातील इतर गावांची भविष्यातील गरज ओळखून आरक्षण रद्द करू नये, तसे केल्यास त्यावर आमची हरकत आहे, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्याधिकारी जाधव यांनी प्रशासनाने जमीन मालक यांच्या अर्जानुसार व नगर रचना विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही केली आहे. मात्र तरीही ग्रामस्थांच्या भावनांचा नक्कीच विचार केला जाईल. तसेच नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, शहरातील शाळा सुरक्षित झाल्या पाहिजेत. शहरातील प्राथमिक शाळा कमी पटसंख्येमुळे अडचणीत आल्या आहे. त्यासाठी आपण आपल्या भागातील ओझरवाडी भागातील प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमाचा प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे या शाळेतील पट संख्या सव्वाशे पेक्षा अधिक झाली आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतल्यामुळे बदल घडला आहे. याच धर्तीवर गोवळकोट येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्रयोग केला जाईल. त्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील. तसेच या आरक्षण बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!