WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

विद्यार्थ्यांच्या सहल बसचा अपघात


विद्यार्थ्यांच्या सहल बसचा अपघात

🔴फुणगूसमध्ये घडली घटना

🔴१३ जण जखमी

🔴 स्थानिकांनी घडविले माणुसकीचे       दर्शन

🔴 मोठी दुर्घटना टळली

संगमेश्वर : बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) सकाळी अपघातग्रस्त झाली. गणपतीपुळे येथून महाडच्या दिशेने निघालेली सहल बस संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावच्या भोसलेवाडी परिसरात मुख्य रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात १३ विद्यार्थी व प्रौढांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या तत्पर मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली.

चाटे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, धारूर (जि. बीड) येथील इयत्ता चौथी ते आठवीतील विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक सहल होती. एम.एच. १२ / एच.बी. ०११४ क्रमांकाच्या बसमधून एकूण ४१ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये ३५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि २ मावश्या यांचा समावेश होता. बस चालक कृष्णा शिरीषराव चाटे हे वाहन चालवत होते.

सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास फुणगूस येथे बस आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाला आणि बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या रडण्याचा व किंकाळ्यांचा आवाज परिसरात घुमू लागला. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. अपघाताचे दृश्य भयावह असतानाही नागरिकांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षितपणे बाहेर काढले. घाबरलेली, रडणारी मुले पाहून अनेक नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. मात्र त्यांनी धीराने परिस्थिती हाताळत विद्यार्थ्यांना आधार दिला.

या अपघातात साक्षी गायके (१४), अरुणा मैद (३६), सृष्टी गोरे (९), मयुरी विलास पवार (१४), गणेश रमेश गोरे (१४), प्रीतम देवराव रोडे (१५), अजय सतीश नागस (९), विठ्ठल नानोबा हुलगे (१३), रितेश विलास बाडये (९), राखू विठ्ठल घोडके (३०), सारिका बालाजी कवके (३४), ओंकार सुधीर गिरी (१२) आणि प्रताप प्रकाश फड (१२) यांना किरकोळ दुखापत झाली. सर्व जखमींवर फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्वजण सुखरूप आहेत.

अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत थुळवाडी व परिसरातील नागरिकांनी माणुसकीचा उत्तम आदर्श घालून दिला. फटकरे गुरुजी, थूळ गुरुजी तसेच थुळवाडीतील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. घाबरलेल्या मुलांना धीर देणे, त्यांना प्रेमाने समजावून सांगणे तसेच जेवण-पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

फुणगूस गावचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली, तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था सेवानिवृत्त शिक्षक विजय फटकरे यांनी केली. गरजेची प्रत्येक मदत स्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केली. अनोळखी असूनही या मुलांना आपलेच समजून दिलेल्या मदतीमुळे परिसरात माणुसकीचे दर्शन घडले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!