रस्ता बांधकामात खाजगी कंपाऊंडची तोडफोड
🔴पोफळी पवारवाडीतील धक्कादायक प्रकार
🔴कारवाईसह नुकसानभरपाईसाठी भूपेश मोरे यांचे आमदारांना निवेदन
🔴कंत्राटदाराने परवानगीशिवाय बांधकाम तोडल्याचा आरोप
चिपळूण : पोफळी-पवारवाडी येथे रस्ता बांधकामादरम्यान आपल्या खासगी मालमत्तेच्या दगडी कंपाऊंडची परवानगीशिवाय तोडफोड करून ते रस्त्याला जोडण्यात आल्याचा आरोप करीत येथील रहिवासी भुपेश शंकर मोरे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय, नुकसानभरपाई आणि संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विकासकामांना आपला कोणताही विरोध नाही. मात्र विकासकामांच्या नावाखाली एखाद्या नागरिकाच्या खासगी मालमत्तेचे नुकसान करून त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर तो विकास नसून अन्याय आहे.

पोफळी-पवारवाडी येथे त्यांच्या मालकीच्या दगडी कंपाऊंडला लागून अधिकृत रस्त्याचे बांधकाम सुरू असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या कंपाऊंडची तोडफोड करण्यात आली आणि तो भाग रस्त्याला जोडण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनानुसार, संबंधित रस्त्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले असून, कामाची अंमलबजावणी ‘श्री स्वामी समर्थ मजूर सहकारी संस्था’ यांच्या माध्यमातून झाली. प्रत्यक्ष काम वैभव पवार हे पोट कंत्राटदार म्हणून करीत होते, असे मोरे यांनी नमूद केले आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर मोरे यांनी कंपाऊंडच्या नुकसानीबाबत कंत्राटदार वैभव पवार यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी, “काही ग्रामस्थांनी मला सांगितले की, हा कंपाऊंड रस्त्याला जोडावा, म्हणून मी तसे केले,” असे कंत्राटदाराने सांगितल्याचा दावा मोरे यांनी निवेदनात केला आहे.
दरम्यान, मागील आठ ते नऊ महिन्यांपासून या प्रकरणाबाबत संबंधित कंत्राटदार, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक तसेच इतर संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. मात्र अद्याप कोणतीही समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आलेला नाही तसेच नुकसानभरपाईबाबत लेखी उत्तरही मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे.
एखाद्या खासगी मालमत्तेवर कोणतेही काम करण्याचा अधिकार संबंधितांना नसताना ग्रामस्थांच्या सांगण्यावरून कंपाऊंडची तोडफोड करण्यात आली असेल, तर या प्रकाराची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. संबंधित कंत्राटदाराला अशी कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला, याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“अनेक वर्षांच्या कष्टातून माझी मालमत्ता उभी केली आहे. दगडी कंपाऊंडची देखभालही मी स्वतःच्या खर्चाने केली आहे. एका सार्वजनिक कामाच्या नावाखाली माझ्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि त्यानंतर न्यायासाठी अनेक महिने फिरावे लागत आहे. एका सामान्य नागरिकासाठी यापेक्षा मोठी वेदना कोणती असू शकते?” असा सवाल मोरे यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून नुकसान झालेल्या मालमत्तेचा पंचनामा करावा, झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळवून द्यावी तसेच नियमबाह्य पद्धतीने खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.












