WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मोफत प्रवासी वाहतुकीद्वारे छ.शिवाजी महाराजांना मानवंदना


मोफत प्रवासी वाहतुकीद्वारे छ.शिवाजी महाराजांना मानवंदना

शिवजयंतीनिमित्त चिपळूणमध्ये रिक्षा व्यवसायिकांचे अनोखा उपक्रम

चिपळूण : शिवजयंतीनिमित्ताने छ. शिवाजी महाराज चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे रिक्षा व्यवसायिकांनी मोफत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात या सेवेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंडळाचे अध्यक्ष विनायक रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या रिक्षा स्टॉपवर एकूण ५० रिक्षा कार्यरत असून त्यापैकी १५ रिक्षा व्यावसायिकांनी स्वखुशीने या सेवेत सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी केवळ एका रिक्षा व्यवसायिकाने ही सेवा सुरू केली होती. त्याच प्रेरणेतून यावर्षी तब्बल १५ ‘शिलेदार’ या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चिपळूण शहर मर्यादेत ही मोफत प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध आहे. या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.

या उपक्रमाबाबत रिक्षा व्यावसायिक अमोल जाधव यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षी सर्व रिक्षा व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावा, अशी आमची इच्छा आहे.”

शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत रिक्षा व्यवसायिकांनी दाखवलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. शहरातील विविध स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून, ही सेवा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!