शिवरायांचा आदर्श अंगीकारल्यास समाज आणि देशाची प्रगती – डॉ. सुमिता शिर्के
चिपळूणः छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. महाराजांचे कौशल्य नियोजन, व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवीत. स्वयंशिस्त अंगीकारली पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याने शिवचरित्रे वाचली पाहिजेत. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड आवश्यक असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम जोपासले पाहिजे. शिवरायांचा आदर्श अंगीकारूनच समाज आणि राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते, असे मत रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांनी व्यक्त केले.
कोंढे येथील सीबीएसई स्कूल येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या पताका, आकर्षक रांगोळ्या आणि शिवकालीन सजावटीने नटला होता. यानिमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. सौ. पूर्वा टाकळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्वराज्य स्थापनेचा ध्यास, शौर्य, पराक्रम, कर्तव्यनिष्ठा, तसेच स्त्रीसन्मान आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांवर प्रकाश टाकला.
प्री – प्रायमरीच्या चिमुकल्या रुद्र कामेरकरने, सहावीतील द्रिती पाटील, पाचवीतील रुंजी सावंत व ओवी हेलेकर यांनी जोशपूर्ण ‘शिवगर्जना’ सादर केली. त्यांच्या निरागस पण ठाम आवाजातल्या गर्जनेने संपूर्ण वातावरण दणाणून गेले. उपस्थित पालक आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. राजदीप कदम, सई शिर्के, शुभ्रनील करगुटकर, नित्या किलजे या विद्यार्थ्यांनी तसेच सहावीचा हर्ष कदम आणि सातवीतील संध्या जयस्वाल यांनी शिवजयंतीनिमित्त प्रभावी भाषण केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रवास, अफजलखान वध, सिंहगड विजय, तसेच प्रजेप्रती असलेली बांधिलकी यांचा उल्लेख करत उपस्थितांना इतिहासाची सफर घडवली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पाळणा नृत्याने कार्यक्रमात सांस्कृतिक रंग भरला. पारंपरिक पोशाखात आणि सुरेल संगीताच्या तालावर सादर झालेल्या या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आणि प्रेरणादायी गाणे सादर केले. गीताच्या ओळींमधून शिवरायांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला दमदार आणि जोशपूर्ण पोवाडा मुख्य आकर्षण ठरला. ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रभावी अभिनयातून सादर झालेल्या या पोवाड्याने शिवकालीन युद्धदृश्ये आणि पराक्रम जणू प्रत्यक्ष अनुभवायला लावले. विद्यार्थ्यांच्या संवादफेकीतील ताकद आणि अंगभूत आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी उभे राहून दाद दिली. शेवटी सर्वांनी एकमुखाने “जय भवानी, जय शिवाजी’चा नारा देत शिवरायांना अभिवादन केले.












