कुंभार्ली घाटात पुन्हा वाहनांच्या रांगा
🔴ट्रक बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प
🔴एस.टीसह प्रवाशांना मोठा फटका
चिपळूण : कुंभार्ली घाट येथे गुरुवारी सकाळी मालवाहतूक करणारा ट्रक अचानक बंद पडल्याने चिपळूण–कराड मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

माल वाहतूक करणारा ट्रक घाटातील अवजड वळणावर बंद पडल्यामुळे मोठी वाहने आणि अवजड वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली. याचा फटका एस.टी बससेवेलाही बसला. अनेक प्रवासी वेळेवर आपल्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. काही प्रवाशांनी संताप व्यक्त करत संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. याशिवाय रुग्णांचेही हाल झाले.
कुंभार्ली घाटात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असून कधी खड्ड्यांमुळे, कधी तीव्र वळणांमुळे ट्रक पलटी होण्याचे प्रकार घडतात, तर कधी वाहने घाटातच बंद पडतात. परिणामी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
दरम्यान, अडीच तासानंतर या मार्गांवरची एक लेन सुरु झाली आहे.










