अजिंक्यतारा गडावरून येणार शिवज्योत
चिपळूण स्पोर्ट्स अकॅडमीचे शिलेदार ज्योत आणण्यासाठी रवाना
चिपळूण : येथील चिपळूण स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शिवजयंतीनिमित्त गेली २१ वर्षे महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्याची परंपरा अखंडपणे जोपासली जात आहे. यंदा या उपक्रमाचे २२वे वर्ष असून सातारा येथील अजिंक्यतारा गड येथून शिवज्योत आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
यापूर्वी अकॅडमीच्या वतीने शिवनेरी गड, राजगड, तोरणा किल्ला, लोहगड, हरीहर गड, प्रतापगड, सिंहगड तसेच हरिश्चंद्रगड आदी गडांवरून शिवज्योत आणण्यात आली आहे. या उपक्रमातून युवकांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.
या वर्षीच्या मोहिमेचा शुभारंभ बुधवार, दि. १८ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, मंगेश तांबे, जयवंत चितळे तसेच गटनेते शशिकांत मोदी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोहिमेला प्रारंभ झाला.
अकॅडमीचे कार्यकर्ते बुधवारी साताऱ्याकडे रवाना झाले असून उंब्रज मार्गे गुरुवारी सकाळी ८ वाजता शिवज्योत चिपळूणात दाखल होणार आहे. शिवज्योतीचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात येणार असून शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेत ओंकार सुतार, रणजीत लोलम, मनिष मोरे, गणेश राठोड, रोहित बारे, पृथ्वीराज आग्रे, राहूल तांदळे, स्वरजित कानापडे, सिद्धेश पवार, मयुर घडशी, स्वरूप पाटणकर, आयुश भैरवकर, ओम हरवडे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेली ही परंपरा चिपळूणमध्ये शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरत असून युवकांमध्ये शिवचरित्राची जाज्वल्य प्रेरणा जागवण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.











