अपरांत हॉस्पिटल येथे डायलिसिससह अत्याधुनिक उपचार सुविधा सुरू
चिपळूण : किडनीच्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण पायरी उचलत अपरांत हॉस्पिटल येथे डायलिसिस विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस ही जीवन-मरणाचा फरक ठरवणारी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा असून, आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार वारंवार करावी लागणारी ही प्रक्रिया आता अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत डायबेटीस, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड विकार, जंतुसंसर्ग यांमुळे मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी पेरीटोनियल डायलिसिस व हिमोडायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच विषबाधा झालेल्या रुग्णांसाठी चारकोल डायलिसिस, तर जीबी सिंड्रोमसारख्या दुर्मिळ व गंभीर आजारांसाठी प्लाझ्मा फेरेसिस ही उच्चस्तरीय (High-End) उपचार प्रक्रिया देखील या विभागात उपलब्ध करण्यात आली आहे.
या विभागात २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अनुभवी तंत्रज्ञ, अद्ययावत अतिदक्षता विभाग, आपत्कालीन डायलिसिस सुविधा, निष्णात नेफ्रोलॉजिस्ट व फिजिशियन यांचे समुपदेशन, अत्याधुनिक डायलिसिस मशिन्स तसेच कुशल पॅथॉलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट यांचा समावेश आहे. गंभीर रुग्णांसाठी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विनायक उकिर्डे, यूरोलॉजिस्ट डॉ. सागर कोल्हे, सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर, फिजिशियन डॉ. शशिकांत गायकवाड व डॉ. ओंकार खोत यांच्यामार्फत उपचार व सल्ला दिला जाणार आहे.
उद्घाटन प्रसंगी सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर, फिजिशियन डॉ. शशिकांत गायकवाड, डॉ. ओंकार खोत, डॉ. सौरभ सुर्वे, ऑर्थोपेडिक कन्सल्टंट डॉ. श्रीश भास्करवार, महिला सर्जन डॉ. भक्ती पालांडे, डॉ. प्राची हरवंदे, डॉ. अंकुश शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. सिद्धेश लाड, श्री. मल्लेश लकेश्री, सौ. नीता जाधव, श्री. सुमित सागवेकर, श्री. चंदनशिवे, श्री. जोतिराम कांबळे, श्री. अमित कदम व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी बोलताना हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक डॉ. यतीन जाधव यांनी सांगितले की, डायलिसिस रुग्णांसाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे ध्येय असून, ही सेवा निश्चितच रुग्णाभिमुख ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











