WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मालदोली नं.१ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


मालदोली नं.१ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

मालदोली : जिल्हा पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा मालदोली नं.१ येथे मालदोली केंद्राची शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रशासकीय मार्गदर्शन या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक परिपाठ सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर केंद्रप्रमुख श्री. जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचेही स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना केंद्रप्रमुख श्री. जोशी यांनी शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सातत्याने नव्या पद्धती आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

बिवली शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाडगावकर यांनी ‘स्तरनिहाय अध्ययन-अध्यापन साहित्य निर्मिती’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून अध्यापन साहित्य तयार केल्यास शिक्षण अधिक परिणामकारक ठरते, असे त्यांनी सांगितले. श्री. हळये यांनी ‘स्पीच थेरपी’ म्हणजे काय याचे सविस्तर स्पष्टीकरण देत अडखळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिचे महत्त्व अधोरेखित केले. योग्य मार्गदर्शन व सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवता येतो, असे त्यांनी नमूद केले.
करंबवणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई यांनी वर्गप्रक्रियेतील सकारात्मक व सुधारणात्मक बाबी तसेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अध्यापनात सर्जनशीलता व विद्यार्थीकेंद्रित पद्धतींचा अवलंब करण्यावर त्यांनी भर दिला.

श्री. जयकुमार व्यवहारे यांनी गणित अध्यापनावर आधारित शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि ‘गणित पेटी’विषयी सविस्तर माहिती दिली. गणित पेटीतील साहित्याचा योग्य वेळी व योग्य पद्धतीने वापर केल्यास विद्यार्थ्यांना संकल्पना सहज समजतात, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

यावेळी केंद्रप्रमुख श्री. जोशी यांनी प्रशासकीय बाबींची माहिती देत विविध शासकीय उपक्रम, नोंदवही लेखन व शालेय व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेतील चर्चेत श्री. पवार, श्री. मोरे, सौ. आयरे व सौ. कदम यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. जयकुमार व्यवहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले व शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!