वाढदिवशी शुभेच्छा, बॅनर नकोत : आमदार शेखर निकम
अजितदादांच्या अपघाती निधनामुळे घेतला निर्णय
समाजहिताचे विधायक कार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुःखद अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी अत्यंत भावनिक निर्णय जाहीर केला आहे. येत्या १ मार्च २०२६ रोजी त्यांचा वाढदिवस असला तरी यावर्षी कोणताही सत्कार, शुभेच्छा समारंभ किंवा उत्सवी कार्यक्रम स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“अजितदादांच्या जाण्याने आपण एक मार्गदर्शक, कणखर नेतृत्व आणि जनतेसाठी झटणारा नेता गमावला आहे. अशा शोकाकुल वातावरणात वैयक्तिक आनंद साजरा करणे मनाला पटत नाही,” अशा शब्दांत आमदार निकम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी आपल्या सर्व मतदारबंधू-भगिनींना, कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना नम्र आवाहन केले आहे की, वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर, पोस्टर, जाहिराती किंवा कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्या दिवशी दिवंगत नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन करावे आणि समाजहिताचे एखादे विधायक कार्य करून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकारणात संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.











