WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

फरक वाटपात भेदभाव,  एस.टी कर्मचारी संतप्त


फरक वाटपात भेदभाव, एस.टी कर्मचारी संतप्त

दापोली, राजापूर आगारात वाटप, इतरांना ठेंगा

 

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातील एस.टी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी मधील वेतन फरकाची रक्कम केवळ दापोली आणि राजापूर आगारात देण्यात आली. जिल्ह्यातील उर्वरीत आगारात फरकाची रक्कम न देता भेदभाव करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्याची भावना चिपळूण आगार एस.टी कामगार सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केली.

वेतनवाढीसाठी राज्यभरातील एस.टी कामगारांनी बेमुदत आंदोलन केल्यानंतर गतवर्षी राज्य सरकारने वेतनवाढीचा निर्णय घेतला. वेतनवाढीतील फरकाची रक्कम ४८ हप्त्यात देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार गेल्या दोन महिन्यापासून फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यास सुरवात केली होती. नियमित वेतनात फरकाची रक्कम अदा केली जात होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात केवळ दापोली आणि राजापूर आगारातील कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम पगारासोबत देण्यात आली. एस.टी महामंडळाच्या रत्नागिरी विभागात चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर आगाराचा समावेश आहे. मात्र ९ आगारापैकी केवळ दापोली आणि राजापूर आगारातील कर्मचाऱ्यांनाच वेतन फरकाची रक्कम अदा झाली. एकाच विभागात एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये असा भेदभाव कशासाठी? असा सवाल एस.टी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. राज्यातही काही आगारांमध्ये वेतनातील फरक अदा झाला, काही ठिकाणी तो दिला नाही. यावरून एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वेतनातील फरकाची रक्कम तातडीने अदा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा एस.टी कामगार सेनेने दिला आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!