शिवप्रतिष्ठान मित्र मंडळातर्फे उद्या शिवजन्मोत्सव सोहळा
चिपळूण : शहरातील पवारआळी येथील शिवप्रतिष्ठान मित्र मंडळातर्फे गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती महोत्सवानिमित्त भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासाची, संस्कृतीची आणि शौर्यगाथेची उजळणी करण्यासाठी हा महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.
शिवभक्तांना स्वराज्याच्या त्या सुवर्णकाळाची अनुभूती देण्यासाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
मशाल प्रस्थान आणि आगमन
दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता मंडळातील तरुण मावळे आणि शिवभक्त पवारआळी येथून खेड तालुक्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याकडे मशाल (ज्योत) आणण्यासाठी प्रस्थान करतील. दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता ही शिवज्योत चिपळूण येथे आगमन करणार असून त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री जुना कालभैरव मंदिर येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल.
धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा
सकाळी ११ वाजता शिवज्योतीचे पवारआळीतील शिवप्रतिष्ठानच्या सभामंडपात आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार असून श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल. दुपारी २ ते ४ या वेळेत भक्तगणांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सायंकाळी ६ वाजता लहान मुलामुलींचे करमणूक कार्यक्रम होणार असून रात्री ८ ते १० या वेळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. रात्री १० वाजता आई मानाई देवी नमन मंडळ, ताम्हणमळा (सहाणवाडी) यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश घोरपडे, उपाध्यक्ष दीपक पवार, सेक्रेटरी निलेश डांगे, खजिनदार प्रवीण पवार यांनी केले आहे.











