चिपळूण शहराला निधी कमी पडू देणार नाही!
🔷अर्थ राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांची ग्वाही
🔷नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली भेट
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत चिपळूण नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
चिपळूण शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच भविष्यातील विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असून, तो निधी उपलब्ध करून देण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी राज्यमंत्री जयस्वाल यांच्याकडे मागणी केली. यासंदर्भात त्यांनी लेखी निवेदनही राज्यमंत्री जयस्वाल यांना सादर केले.
या वेळी बोलताना राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी चिपळूण नगर परिषदेच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. चिपळूणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सकारात्मक असून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री जयस्वाल यांनी उमेश सकपाळ यांच्या कार्यशैलीचे आणि सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी उमेश सकपाळ यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच चिपळूण नगर पालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामांचा आढावा घेण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
या भेटीमुळे चिपळूण शहराच्या विकासाला गती मिळणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












