चिपळुणात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात युतीची मुसंडी
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेच्या बालेकिल्यात शिवसेना- भाजप युतीने मुसंडी मारली. परिणामी खेर्डी आणि वहाळ गटात राष्ट्रवादीचे सभापतीचे पदाचे दावेदार असलेले उमेदवार गारद झाले. या दोन्ही गटात झालेला पराभव राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला आहे. सावर्डे गटातून मात्र आमदार शेखऱ निकम यांच्या पत्नी व माजी सभापती पुजा निकम यांनी शिंदेसेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांचा तब्बल ५ हजार ६१९ विक्रमी मताधिक्यांनी पराभव केला. निकम यांचे हे मताधिक्य तालुक्यात सर्वाधिक राहिले आहे.
चिपळूण पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरवातीलाच स्वबळाचा नारा देत एकहाती किल्ला लढवला. मात्र त्यांना मोठा पल्ला गाठता आला नाही. पालिका निवडणुकीत अपयश आल्यानंतर आमदार शेखर निकम व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जोमाने लढण्याची तयारी केली होती. आमदार शेखर निकम यांनीही प्रत्येक गण आणि गटात बारकाईने लक्ष देत मतांची गोळाबेरीज करण्यावर भर दिला होता. कार्यकर्त्याना उणीव भासणार नाही, याची खबरदारी घेतली होती. खेर्डी जिल्हा परिषद गटावर नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यावेळी या गटात भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली. जिल्हा परिषद गटातून भाजपच्या रावी सतीश मोरे विजयी झाल्या, तर जिल्हा बॅंकेच्या संचालिका आणि दुसऱ्यांदा या निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या दिशा दाभोळकर यांना पराभव स्विकारावा लागला. तसेच खेर्डी पंचायत समिती गणात तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, भाजपकडून तालुकाध्यक्ष विनोद भुरण तर शिवसेना उबाठाकडून युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते रिंगणात होते. एक गाव आणि एकच गण असलेल्या या गणातून भाजपने राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली. तालुकाध्यक्ष विनोद भुरण विजयी झाले. निवडणुकीपूर्वी खेर्डीत राष्ट्रवादीची एकी झाली होती, तरिही त्यांना पराभव स्विकारावा लागला.
वहाळ जिल्हा परिषद गटात देखील राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या गणातून राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले यांना नवख्या संजय जावळे या उमेदवाराने पराभूत केले. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आली असती तर सुरेश खापले आणि नितीन ठसाळे हे सभापती पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र हे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने आमदार निकमांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. वहाळ गटात शिवसेनेचे संदीप सावंत हे किमयागार ठरले. या गटातून त्यांची पत्नी शिवानी सावंत जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत. तर निवळी गणातून उबाठाच्या संजीवनी खापरे यांनी दुसऱ्यांदा पंचायत समितीवर बाजी मारली. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे शरद शिगवण व उबाठाच्या खापरे हे दोनच उमेदवार सलग दुसऱ्यांदा पंचायत समितीवर निवडून गेले आहेत.
कळवंडे गट पूर्वीच्या मालदोली गटातून आणि गणातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र यावळेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने येथे मुसंडी मारली. कळवंडे गटात राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही.












