WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘सह्याद्री’ची चित्रे झळकणार बेळगावात!


‘सह्याद्री’ची चित्रे झळकणार बेळगावात!

सावर्डे : सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या कलामहाविद्यालयाच्या पेंटिंग विभागातील चार विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून के. बी. कुलकर्णी स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित कला स्पर्धेसाठी त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेसाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील सृष्टी कुंभार, सिद्धी मांडे, सौरभ साठे आणि सिद्धार्थ भोवड या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या पेंटिंग विभागात शिक्षण घेत असून त्यांनी सादर केलेल्या चित्रांमध्ये कल्पकता, विषयाची सखोलता आणि रंगसंगती यांचा उत्तम समन्वय दिसून येतो. विविध कला महाविद्यालयांमधून आलेल्या असंख्य कलाकृतींमधून त्यांच्या चित्रांची निवड होणे ही त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि कलात्मक गुणवत्तेची दखल मानली जात आहे.

निवड झालेल्या या चित्रांचे प्रदर्शन दि. ४ फेब्रुवारी २०२६ ते दि. ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वरेकर नाट्य संघ, टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील कला रसिक, कलाकार आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला व्यापक पातळीवर सादर करण्याची संधी मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कलावाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कला शिक्षणाची साक्ष देणारे ठरत असून भविष्यातही असेच उल्लेखनीय यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!