जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत एका युजरवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा फोटो एडिट करून, वादग्रस्त मजकूर लिहून बनावट पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका सोशल मीडिया युजरविरोधात भारतीय न्यायसंहिता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल रामलोचनसिंग ठाकूर (वय ५९) हे श्री जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीजधाम येथे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या टेक्निकल टीमकडून महाराजांचे कार्यक्रम व उपक्रम याबाबतचे अपडेट्स दररोज इंस्टाग्राम व यूट्यूबसारख्या सोशल मीडियावर प्रसारित केले जातात.
दरम्यान, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास official_anil_jadhav या युजरनेमने सोशल मीडियावर महाराजांचा फोटो स्वतःच्या फोटोसोबत जोडून बनावट फोटो तयार केला. संबंधित व्यक्तीने Instagram व Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो फोटो शेअर केला.
तपासात असे समोर आले की, प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीने महाराजांसोबत फोटो काढलेला नसतानाही तो खरा असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. तसेच त्या पोस्टवर वादग्रस्त मजकूर लिहून महाराजांच्या लौकिकास बाधा निर्माण होण्याची शक्यता असून लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट शेअर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दि. ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.३९ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.













