WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

महामार्गाच्या प्रत्येक खड्ड्यातून एक वेदना…प्रत्येक प्रवासातून एक संदेश! 


 

महामार्गाच्या प्रत्येक खड्ड्यातून एक वेदना…प्रत्येक प्रवासातून एक संदेश! 

चैतन्य पाटील यांचा 29 दिवस 490 कि.मी.चा पायी प्रवास, सत्याग्रहाची सांगता 

 

रत्नागिरी : “महामार्ग फक्त प्रवासासाठी नाही, तर जीव वाचवण्यासाठीही सुरक्षित असावा” ही भावना मनात ठेवून सुजान नागरिक चैतन्य लक्ष्मण पाटील यांनी ‘रस्ता सत्याग्रह’ अशी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, खड्ड्यांची समस्या तसेच वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पायी यात्रा काढून लोकजागृतीचा अनोखा मार्ग निवडला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच महामार्गावर खड्यांची गंभीर समस्या असून, यामुळे वारंवार अपघात होत आहेत. यात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मिडलकट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गावरील प्रवास असुरक्षित बनला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील चैतन्य पाटील यांनी ‘रस्ता सत्याग्रह’ मोहीम हाती घेतली आहे. या सत्याग्रहात ते पनवेलपासून बांदा चेक पोस्टपर्यंत पायी महामार्ग पाहणी दौरा करीत आहेत. ही पदयात्रा केवळ आंदोलन नाही, तर एक जनसंपर्क मोहीम आहे. स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेले चैतन्य पाटील या रस्ता सत्याग्रहात महामार्गालगतच्या गावांमध्ये थांबून नागरिकांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या ऐकून घेतात आणि याचा सविस्तर लेखाजोखा अहवाल स्वरूपात शासनाकडे पाठविणार आहेत.

९ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी रायगड जिल्ह्यातील पळस्पे फाटा येथून या सत्याग्रहाला प्रारंभ केला. ‘रस्ता सुरक्षा, अपघात टाळणे व नागरिकांच्या हक्कासाठी एक पाऊल पुढे’ अशी टॅगलाईन घेऊन त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. महामार्गावरील अपघातग्रस्त भागांची पाहणी करून ते रस्ता सुधारणा, सिग्नल व्यवस्था, स्पीड लिमिट्स याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. तसेच याविषयी ते थेट लोकांमध्ये जागरुकता निर्माण करत आहेत.

रत्नागिरी जिल्हा पायी पार करून ते शनिवारी सिंधुदुर्गात दाखल झाले. रविवारी ते कुडाळ येथून पुढे बांदा चेक पोस्टच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी त्यांना डिगस येथील श्रीकृष्ण शिरोडकर यांचे सहकार्य मिळाले. तेही चैतन्य यांच्यासमवेत या मोहिमेत कुडाळमधून पायी सहभागी झाले. अखेर २९ दिवसांच्या तब्बल 490 कि.मी. पायी प्रवासानंतर “रस्ता सत्याग्रह” चा शेवट महाराष्ट्र–गोवा सीमेवर झाला.

 

चैतन्य पाटील यांच्या मोहीमेचे उद्दिष्ट

महामार्गावरील खड्डे, ब्लॅक स्पॉट, अपूर्ण कामे, धोकादायक वळणांची पाहणी, अपघातग्रस्त ठिकाणांची नोंद, शासनाला अहवाल पाठविणे व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, अशी या मोहिमेची उद्दिष्ट असल्याचे चैतन्य त्यांनी सांगितले.

 

अहवाल संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यास सहकार्य करा!

चैतन्यला कोणाचाही पैसा नको, लाईक्स नको, सब्सक्राइब नको तर, त्याचा रस्त्यासंबंधितचा हा अहवाल संबंधित यंत्रणेला तुमच्याही माध्यमातून पाठवावा. कोकणवासीयांनी विविध मार्गांनी हा अहवाल संबंधित यंत्रणेकडे पाठविल्यास निश्चितच या महामार्गाच्या कामाला चालना मिळेल, यासाठी कोकणवासीयांनी पुढाकार घ्यावा, एवढीच आपली विनंती असल्याचे ते म्हणाले.

रस्त्यावरचा संघर्ष देशभर पोहोचल्याचे समाधान

मी स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. माझा कोणताही राजकीय पक्ष नाही किंवा कोणतीही संघटना नाही. या प्रवासात 490 कि.मी. अंतर पायी पार करत महामार्गावरील जनजीवन, अपघातस्थळं, नागरिकांच्या भावना आणि प्रशासनाचा प्रतिसाद प्रत्यक्ष जाणून घेतला. या प्रवासात रस्त्यांवरील वेदना, आशा, संघर्ष आणि बदलाची इच्छा — हे सगळं जवळून पाहायला मिळालं. हा प्रवास फक्त रस्त्यांचा नव्हता… तो जनतेच्या सुरक्षिततेचा आणि जबाबदार प्रशासनाच्या अपेक्षांचा होता. सांगतेच्या या क्षणी महाराष्ट्र आणि गोवा पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आनंद साजरा केला. “सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास!”प्रत्येक खड्ड्यातून एक वेदना, आणि प्रत्येक प्रवासातून एक संदेश. रस्त्यावरचा हा संघर्ष आता देशभर पोहचतो आहे. या संपूर्ण प्रवासात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या सर्व समाजप्रेमी, पत्रकार, पोलीस अधिकारी, नागरिक, आणि माझ्या परिवाराचे मनःपूर्वक आभार. तुमचं प्रोत्साहन हेच माझं खरं बळ होतं. या रस्ता सत्याग्रहात रस्त्यावरील असलेले खड्डे, धोकादायक ठिकाणे, असुरक्षित प्रवास, रखडलेले काम यांची पाहणी करून शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्यासाठी सविस्तर अहवाल आपण शासनाकडे पाठविणार आहे. यात त्रुटी काढत नसून, काय उपाययोजना करता येतील त्या उपाययोजनाही आपण सुचवित आहे.

– चैतन्य पाटील, रस्ता सत्याग्रही

मो. 8766797529

 

 


619
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!