WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

प्रदूषणाच्या मुद्द्यावर कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचा ‘हल्लाबोल’


प्रदूषणाच्या मुद्द्यावर कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचा ‘हल्लाबोल’

चिपळूण : कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) चिपळूण विभागीय कार्यालयात ‘हल्लाबोल’ करण्यात आला. प्रादेशिक अधिकारी श्री. कुलकर्णी हे अपघातग्रस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत क्षेत्र अधिकारी श्री. शिंगारे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत विविध गंभीर मुद्दे उपस्थित केले.

बैठकीदरम्यान भरत लब्धे, पंकज दळवी, सिराज दलवाई, अल्ताफ कादरी, तुळशीराम पवार, डॉ. शमीना परकार, स्वाती भोजने, वीणा जावकर आदींनी प्रदूषणासंदर्भातील अनेक तक्रारी मांडल्या.

प्रमुख मुद्दे आणि मागण्या
टँकर प्रकरणाची सखोल चौकशी करा
गेल्या आठवड्यात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडून सीईटीपीकडे जाणारा टँकर स्थानिक नागरिकांनी अडवला होता. या टँकरमध्ये पिफास (PFAS) सारखे घातक रसायन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे हा टँकर पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात असल्याची बाब समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अशा टँकरचा रासायनिक सांडपाण्यासाठी वापर का करण्यात आला? आणि त्याच टँकरमधून पुढे नागरिकांना पिण्याचे पाणी दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा सवाल उपस्थित करत टँकर मालक, चालक आणि कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

जनावरांच्या मृत्यूची चौकशी आणि भरपाई द्या
सोनगाव येथे रसायनयुक्त पाणी पिल्याने ५ ते ६ दुभती जनावरे दगावल्याची घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

भूगर्भातील पाणी दूषित करण्याचा गंभीर प्रकार
आठ जानेवारीच्या मोर्च्यानंतर विविध गावांमध्ये बैठका घेताना नागरिकांनी काही कारखान्यांकडून बोअरवेलद्वारे सांडपाणी व रासायनिक कचरा थेट भूगर्भात सोडण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. यामुळे भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या प्रकरणाची तज्ज्ञ समिती नेमून स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

शेती व बागायतींचे नुकसान भरून काढा
लोटे MIDC परिसरातील अनेक गावांमध्ये आंबा, काजू व रानमेवा पिकांचे कायमस्वरूपी नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यासाठी जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

दाभोळ खाडी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
सीईटीपीमधून अनेक वेळा प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने दाभोळ खाडी प्रदूषित झाली आहे. याचा मोठा फटका मच्छीमारांना बसत असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे संबंधितांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

नियमबाह्य कामांवर बंदी घाला
औद्योगिक क्षेत्रातील सर्व नियमबाह्य प्रकारांवर तात्काळ आळा घालावा, अशी ठाम मागणी समितीने केली.

प्रशासनाचा प्रतिसाद
या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत क्षेत्र अधिकारी श्री. शिंगारे यांनी प्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

उपस्थिती
यावेळी सुवर्णा बेंडके, विनायक जाधव, चंद्रकांत मोहिते, बी. डी. कदम, बाबा चव्हाण, बाळशेठ लांबे, राजा लांबे, मन्सूर सय्यद, कासिम सय्यद, केशव लांबे आदींसह कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!