WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

संतप्त प्रवाशाचा एस.टी स्टॅंडमध्ये धिंगाणा


संतप्त प्रवाशाचा एस.टी स्टॅंडमध्ये धिंगाणा

🔴 कंट्रोलरूमची फोडली काच

🔴 वाहतूक नियंत्रक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

🔴 चिपळूण आगारातील प्रकार, पोलिसात तक्रार

चिपळूण : चिपळूण एस.टी. स्टँड येथील कंट्रोल रूममध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना एका प्रवाशाने वाहतूक नियंत्रक व कर्मचाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ, दमदाटी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची गंभीर घटना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी वाहतूक नियंत्रक विनायक भास्कर कुसाळकर (वय 55) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, विनायक कुसाळकर हे चिपळूण एस.टी. स्टँड येथे गेल्या एक वर्षापासून वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 4 ते दुपारी 12 या वेळेत त्यांची ड्युटी होती. त्यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक नियंत्रक ताहीर नेवरेकर व पाळी प्रमुख संजय यादव हेही कर्तव्यावर उपस्थित होते.

सकाळी सुमारे 7.20 वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्टेशन ते चिपळूण एस.टी. स्टँड अशी एस.टी. बस (क्रमांक एमएच 20 बीएल 4030) मोठ्या प्रवासी गर्दीसह स्टँडवर दाखल झाली. प्रवासी उतरल्यानंतर एका प्रवाशाने एस.टी. कंट्रोल रूमजवळ येऊन “इतके प्रवासी का घेतले?” असा सवाल करत आक्रमक पवित्रा घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता सदर प्रवासी अधिकच चिडला.

या प्रवाशाने वाहतूक नियंत्रक व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता, रागाच्या भरात त्याने कंट्रोल रूमच्या दर्शनी काचेवर जोरात हात मारून काच फोडली. यावेळी त्याच्या हातालाही काच लागली. तसेच कंट्रोल रूममधील टेबलवरील संगणकाला धक्का देऊन तो खाली पाडल्याने संगणकाचे नुकसान झाले.
या घटनेची माहिती पाळी प्रमुख संजय यादव यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्याला दिली. मात्र तोपर्यंत सदर प्रवासी एस.टी. स्टँडवरून पळून गेला होता. नंतर पोलीस व वाहतूक नियंत्रकांनी शोध घेतला असता गुहागर नाका परिसरात तो प्रवासी मिळून आला. चौकशीत त्याने आपले नाव मंगेश मनोहर चव्हाण (वय 29, रा. भोम, ता. चिपळूण) असे सांगितले.

या घटनेमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहतूक नियंत्रक विनायक कुसाळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!