‘स्वच्छ सर्वेक्षण’खालीच गलिच्छ चित्र!
चिपळूण भाजी मंडई शॉपिंग सेंटर परिसरातील प्रकार
वयस्कर महिलेचे अनधिकृत वास्तव्य
चिपळूण : एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत चिपळूण नगर परिषदेने कोकण विभागात प्रथम, महाराष्ट्रात १४ वा तर देशपातळीवर ८७ वा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छतेसाठी एकीकडे जिकरीचे प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे मात्र एका प्रकाराने व्यवसायिकांना चांगलेच हैराण केले आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील हे दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

मुख्य बाजारपेठेतील भाजी मंडई शॉपिंग सेंटर परिसरात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाबाहेर एका वयस्कर महिलेने उघड्यावर संसार थाटल्याचे या परिसरात सध्या गलिच्छ चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच अस्ताव्यस्त साहित्य, भांडी, कपडे व इतर वस्तू ठेवण्यात आल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
या स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून व्यावसायिक व नागरिकांना अक्षरशः नाकावर रुमाल ठेवून या भागातून वावर करावा लागत आहे. विशेषतः महिला भगिनींना या स्वच्छतागृहाचा वापर करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या संदर्भात स्थानिक व्यवसायिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही, असे बोलले जात आहे.
उपरोधिक बाब म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर या स्वच्छतागृहाच्या भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली आहे. भिंतीवर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ असे भल्या मोठ्या अक्षरात लिहिले असताना, त्याच अक्षरांच्या खाली अस्वच्छतेचे आणि दुर्लक्षाचे गलिच्छ चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. ही बाब नागरिकांच्या संतापात अधिकच भर घालणारी ठरत आहे.
या प्रकाराकडे नगर पालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी केला आहे. “फक्त सर्वेक्षणासाठी रंगरंगोटी करून गुण मिळवायचे आणि प्रत्यक्ष स्वच्छतेकडे पाठ फिरवायची का?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तरी नगराध्यक्षांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित ठिकाणी नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करावी, तसेच स्वच्छतागृहाबाहेर अवैधरित्या ठाण मांडलेल्या महिलेला योग्य पुनर्वसनाची व्यवस्था करून तेथून हटवावे, अशी ठाम मागणी केली जात आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मिळवलेले मानांकन कागदापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षातही दिसावे, हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.











