पाऊस नाही… वाढदिवसही नको : शौकतभाई
चिपळूण : कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या चिंतेत आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे सांगत पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी यंदाचा वाढदिवस कोणत्याही स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
१९ जून रोजी शौकतभाई मुकादम यांचा वाढदिवस असतो. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, वृक्षवाटप तसेच जनहिताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून महिलांना व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली असली तरी पाऊस न पडल्याने पिकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत भावना व्यक्त करताना शौकतभाई मुकादम यांनी म्हटले आहे की, “सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात असताना माझा वाढदिवस उत्साहात साजरा होणे मला योग्य वाटत नाही. माझ्या मनालाही ते पटत नाही. त्यामुळे कोणीही मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, कोणतेही सत्कार, पुष्पगुच्छ किंवा कार्यक्रम आयोजित करू नयेत. आपले प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचले आहेत, असे मी समजतो.” तसेच त्यांनी नागरिकांना आणि समर्थकांना पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
“सध्या सर्वात मोठी गरज पावसाची आहे. आपण सर्वांनी ईश्वराकडे चांगल्या पावसासाठी प्रार्थना करूया. निसर्ग कृपा करेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलेल, हीच अपेक्षा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
शौकतभाई मुकादम यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. स्वतःच्या वाढदिवसाचा उत्सव बाजूला ठेवून शेतकरी आणि पाणीटंचाईग्रस्त नागरिकांच्या वेदनांशी एकरूप होण्याचा त्यांचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.











