WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

पावसासाठी हजारो हात दुआसाठी उंचावले!


पावसासाठी हजारो हात दुआसाठी उंचावले!

चिपळुणात मुस्लिम बांधवांची सामूहिक प्रार्थना

चिपळूण : तालुक्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील उक्ताड बायपास रोडवरील इजतिमा मैदानात हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले आणि पावसासाठी विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे सामूहिक प्रार्थना केली. या प्रार्थनेचे नेतृत्व मुफ्ती साबीर डांगे यांनी केले.

सध्या पावसाच्या विलंबामुळे मानवासह सर्व सजीवांना पाण्याअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुस्लिम समाजाने एकत्र येत पावसासाठी दुआ (प्रार्थना) केली.

यावेळी मौलाना सादिक मेस्त्री यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पवित्र कुराण आणि हदीस शरीफमधील संदर्भ देत पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. इस्लाम धर्मात पाण्याचा अपव्यय टाळण्यास विशेष महत्त्व देण्यात आले असून, वाहत्या पाण्यात वजू करतानाही आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचा संदेश पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.व.) यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

पाण्याच्या संवर्धनाबरोबरच वृक्षारोपणाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. “एक झाड लावून ते जिवंत ठेवले तर त्या झाडाचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सजीवामुळे झाड लावणाऱ्याला सतत पुण्य मिळत राहते,” असे सांगत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस अल्लाहकडे सर्व सजीवांवरील पाण्याच्या संकटाचे निवारण व्हावे, निसर्गाच्या नियमांविरुद्ध होत असलेल्या चुकांबद्दल क्षमा मिळावी, समाजाला सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी तसेच लांबलेल्या पावसाला सुरुवात होऊन सर्व जीवसृष्टीला दिलासा मिळावा, अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली. या सामूहिक प्रार्थनेला परिसरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.


596
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!