बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मितीत ‘युनायटेड’च्या वैशाली चितळे यांचे योगदान
चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. वैशाली अतुल चितळे यांची बालभारतीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड झाली होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावीचे इंग्रजी पाठ्यपुस्तक तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी गेल्या वर्षभर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

बालभारतीने प्रकाशित केलेल्या इयत्ता सहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्या या शैक्षणिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक मंडळ, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, उपमुख्याध्यापिका सौ. रेवती कारदगे, पर्यवेक्षक श्री. खाडे व श्री. मुंढेकर आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सौ. चितळे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सौ. चितळे यांच्या या कार्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची प्राप्त झाली असून, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मितीत स्थानिक शिक्षकांचे योगदान अधोरेखित झाले आहे.











