द्वेषपूर्ण वक्तव्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी
मुस्लिम समाज विकास संघ, रत्नागिरीकडून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन
१४ नोव्हेंबर रोजी मुंबईत शांततामय उपोषण
रत्नागिरी : मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुराद अहमद अडरेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून, काही आमदारांकडून होत असलेल्या द्वेषपूर्ण व समाजविघातक वक्तव्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अडरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, श्री. नितेश राणे, श्री. संग्राम जगताप, श्री. गोपीचंद पडळकर आणि सौ. मेधा कुलकर्णी (खासदार) यांनी वारंवार मुस्लिम समाजावर धार्मिक द्वेष निर्माण करणारी आणि सामाजिक सलोखा बिघडविणारी विधाने केली आहेत. ही विधाने भारतीय संविधानातील अनुच्छेद 14, 15, 19 व 21, तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमे 197, 299 व 353 चा भंग करणारी असल्याचे अडरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज्यातील धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक एकात्मता धोक्यात येत आहे. राज्यातील सर्व नागरिकांच्या समानतेचा हक्क अबाधित ठेवणे ही शासनाची जबाबदारी असल्याने, संबंधित आमदारांवर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या पार्श्वभूमीवर संविधानाचा सन्मान राखत व सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील क्रांतिकारक आझाद मैदान येथे एकदिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण पूर्णपणे शांततामय आणि लोकशाही मार्गाने पार पडेल, अशी माहिती अडरेकर यांनी दिली.
ते म्हणाले, “उपोषणादरम्यान आम्ही संविधान आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत समाजातील प्रत्येक घटकात ऐक्याचा संदेश देणार आहोत. मात्र, आम्हाला किंवा आमच्या सहकाऱ्यांना उपोषणस्थळी कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
संघटनेचे हे आंदोलन राज्यपाल, राष्ट्रपती तसेच पोलिस प्रशासनाला अवगत करून कायदेशीर चौकटीतून पुढे नेण्यात येणार असल्याचे अडरेकर यांनी स्पष्ट केले.
📞 संपर्क: मुराद अहमद अडरेकर – जिल्हाध्यक्ष, मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरी
(मो. ७३५०४३११११)













