चिपळूण नागरी परिवारातर्फे भव्य तिरंगा दुचाकी रॅली
देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला!

चिपळूण : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पहावयास मिळाले.

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चिपळूण नागरी परिवारातर्फे आयोजित भव्य दुचाकी रॅलीचा शुभारंभ बहादूरशेखनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, ऍड. नयना पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, संचालक मनोहर मोहिते, राजेंद्र पटवर्धन, रवींद्र भोसले, प्रमोद साळवी, प्रकाश साळवी, चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, नगरसेविका सौ. शितल रानडे, संजय शेरे, अनिल चिले, शशिकांत साळवी, अमोल टाकळे, फैसल पिलपिले, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर गणेश कदम, संदीप पाटील, नितीन खताते, पांडुरंग लवेकर, भिले गावच्या सरपंच सौ. अदिती गुढेकर तसेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५० शाखांमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा फडकवत आणि देशभक्तीपर जयघोष करत सहभागी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेमाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यावेळी ‘वंदे मातरम, भारत माता की जय’, च्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था परिवाराने काढलेल्या तिरंगा रॅलीमुळे ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ चा राष्ट्रभक्तीपूर्ण संदेश जनमानसात पोहोचण्यास मदत झाली आहे. या रॅलीला चिपळूणवासीयांनी तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. नागरीच्या परिवाराने दुचाकीवर तिरंगा लावून या रॅलीत सहभाग घेतला. तर काहींनी हातात तिरंगा घेऊन देशप्रेम जागवले.
ही रॅली बहादुरशेखनाका, काविळतळी, मार्कंडी येथे पोहोचल्यानंतर वेस मारुती मंदिर परिसरातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. यानंतर ही रॅली चिंचनाका पुढे रंगोबा साबळे रोड, चिंचनाका भोगाळे ते बुरूमतळी, सागर प्रेस कडून मुंबई गोवा महामार्ग ते शिवाजीनगर ते पुन्हा बहादूरशेखनाका अशी काढण्यात आली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था परिवारातर्फे काढण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी रॅलीला भव्य उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने राष्ट्रीयत्वाची जपली भावना
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग दर्शवून आपली जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये महापूर असो, कोरोना असो या कालखंडात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. तर कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची भरीव मदत देऊन पतसंस्थांमध्ये इतकी मदत देण्यात अग्रेसर राहिली आहे. गेल्यावर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभाग घेतला होता. यावर्षी देखील ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य दुचाकी रॅली काढून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने राष्ट्रीयत्वाची भावना जपली आहे. यापूर्वी ‘एक पेड माँ के नाम’ हा देखील शासनाचा उपक्रम राबवला आहे. एकंदरीत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग दर्शवून आपले कर्तव्य बजावले आहे.











