स्वकुळ साळी समाज पेठमापतर्फे 17 मेपासून संगीत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा
चिपळूण : पेठमाप येथील स्वकुळ साळी समाजाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने संगीत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या सोहळ्यात नामवंत ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे (बी.ई. सिव्हिल), अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथेचे निरूपण करण्यात येणार आहे. रविवार दि. 17 मे 2026 ते 24 मे 2026 या कालावधीत हा धार्मिक सोहळा उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री उमेश सिताराम काटकर तसेच श्री प्रफुल्ल विष्णू तांबडे , अध्यक्ष स्वकुळ साळी समाज पेठमाप, चिपळूण आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या कालावधीत संगीत, भजन, कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सोमवार दि. 25 मे 2026 रोजी अधिक मासानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत काकड आरती, सकाळी 8 ते 9 महापूजा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ तर रात्री 6.30 ते 9.30 या वेळेत श्रीमद भागवत कथा होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रविवार दि. 17 मे रोजी भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीने होणार असून सायंकाळी 5 ते 7 या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर श्री गणेश पूजन, कलश पूजन, नवग्रह पूजन, तुळस पूजन, ग्रंथ पूजन व ध्वज पूजन असे विविध धार्मिक विधी पार पडतील. रात्री श्रीमद भागवत कथा विषय, भागवत माहात्म्य, गोकर्ण आख्यान व भागवत विधी फल यावर प्रवचन होणार आहे.
सोमवार दि. 18 मे रोजी भक्तचरित्र, नारदव्यास, उद्धवकृती, ध्यानविधी, चतुःश्लोकी भागवत, दुष्टी उत्पत्ती वर्णन व विदुर चरित्र यावर कथा सांगितली जाणार आहे.
मंगळवार दि. 19 मे रोजी कपिल गीता, सती चरित्र, ध्रुव चरित्र, जडभारत चरित्र, नाममहिमा व व्रजभू कथा यावर प्रवचन होईल.
बुधवार दि. 20 मे रोजी प्रल्हाद चरित्र, गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन कथा, वामन अवतार, श्रीराम जन्म तसेच कृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 21 मे रोजी श्रीकृष्ण बाललीला, वृंदावन लीला व कालियामर्दन लीला यांचे रसाळ वर्णन होणार आहे.
शुक्रवार दि. 22 मे रोजी वेणूवादन, रासपंचाध्यायी उत्सव, गोवर्धन लीला, राधालीला, कंसवध व रुक्मिणी स्वयंवर कथा रंगणार आहे.
शनिवार दि. 23 मे रोजी श्रीकृष्ण लीला, सुदामा चरित्र, परीक्षिती मोक्ष तसेच दत्तजयंतीचे 24 गुरु या विषयांवर कथा होणार आहे.
रविवार दि. 24 मे रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 25 मे रोजी विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
स्वकुळ साळी समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेतली असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












