कोकणवासियांना डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य द्याल तर याद राखा!
दादर पॅसेंजर गाडी बंद केल्याविरोधात मनसे आक्रमक
चिपळूण : कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या अद्यापही सुरू न झाल्याने कोकणातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यातच कोकणात धावणारी दादर पॅसेंजर गाडी बंद करून तिच्या ऐवजी परराज्यातील प्रवाशांसाठी गोरखपूरकडे धावणारी गाडी सुरू केल्याचा आरोप होत असून, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. “महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील प्रवाशांची गैरसोय होत असताना परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य दिले जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही,” असा सज्जड दम वजा इशारा यावेळी देण्यात आला.
कोविडनंतरही गाड्या सुरू नाहीत
कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या मुंबई–कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई–मडगाव गोदावरी एक्सप्रेस, पुणे–भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्सप्रेस यांसारख्या अनेक गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कोकण व महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परराज्यांच्या गाड्यांना प्राधान्य?
रेल्वे प्रशासनाने स्थानिक प्रवाशांच्या सोयीपेक्षा परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. दादर पॅसेंजर बंद करून गोरखपूर गाडी सुरू केल्याने कोकणातील दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले.
मनसेचा तीव्र निषेध
मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. “कोकणवासीयांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
आंदोलनाचा इशारा
रेल्वे प्रशासनाने पुढील १५ दिवसांत रद्द गाड्या पुन्हा सुरू केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. “गरज पडल्यास उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या रोखू, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रेल्वे मार्गावर उतरेल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
‘कोणत्याही थराला जाऊ’
“महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रावरच अन्याय होणार असेल, तर मनसैनिक आणि जनता कोणत्याही थराला जाईल,” असा इशारा देत या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.











