WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोकण दौऱ्यात ‘लागली पैज’ नाट्यप्रयोग रंगला


कोकण दौऱ्यात ‘लागली पैज’ नाट्यप्रयोग रंगला

कलाकारांच्या अभिनयाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

रत्नागिरी / चिपळूण : कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाला मिळालेली रसिकांची मनापासून दाद, कधी टाळ्यांचा कडकडाट तर कधी भावनांची खोल अनुभूती… अशा भारावलेल्या वातावरणात ‘लागली पैज’ हा नाट्यप्रयोग कोकण दौऱ्यात रंगतदारपणे सादर होत आहे.
कोकण दौऱ्यातील दोन दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला प्रयोग लांजा येथे सादर करण्यात आला. या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. गुलाबी थंडीतही रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला.
मल्हार प्रकाशित प्रभात थिएटर्स निर्मित ‘लागली पैज’ या मराठी नाटकाचा दुसरा प्रयोग रविवार, १८ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सादर होणार आहे.

हे नाटक हर्षद प्रमोद कठापुरकर यांच्या लेखणीतून साकारले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी अंकुर अरुण काकतकर यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. नाटकाचे निर्माते निखिल एकनाथ करंडे (धामणी) आणि ज्योती प्रमोद कठापुरकर आहेत.

या नाट्यप्रयोगात यशोमान आपटे, रुमाणी खरे, शंतनु अंबाडेकर आणि सुप्रिया विनोद यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘लागली पैज’ या नाटकाला प्रत्येक सादरीकरणात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, अनेक मान्यवरांसह नाट्यरसिकांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे.
पत्रांच्या माध्यमातून उलगडणारे जीवन, नात्यांतील हळवे भावबंध आणि शब्दांच्या नाट्यातून उभे राहणारे प्रसंग ही या नाटकाची खासियत ठरत आहे. पारंपरिक रंगमंचापेक्षा वेगळ्या संकल्पनेतून सादर झालेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांना भावनांचा अविस्मरणीय प्रवास अनुभवायला दिला. प्रत्येक प्रसंगानंतर दुमदुमणाऱ्या टाळ्यांनी प्रेक्षागृह भारावून गेले.
यावेळी रसिक प्रेक्षक राकेश लाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,
“‘लागली पैज’ हे नाटक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, हे पाहून खूप समाधान वाटते. आपल्या कोकणातील रसिकराजा खूपच संवेदनशील आहे. लांजामध्ये पहिल्या प्रयोगाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अविस्मरणीय होता. आज परशुरामभूमी चिपळूणमध्येही तसाच भरभरून प्रतिसाद मिळेल, याबाबत मला कोणतीही शंका नाही.”

कोकणातील नाट्यरसिकांसाठी ‘लागली पैज’ हा नाट्यप्रयोग एक वेगळा, भावस्पर्शी अनुभव ठरत असून, या नाटकाने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!