सोशल मीडियासाठी योग्य सेन्सरशिप हवी : अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते
स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवात प्रेरणादायी संवाद
सावर्डे : स्वर्गीय गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री गार्गी निळू फुले-थत्ते यांची सखोल, प्रामाणिक व विचारप्रवर्तक मुलाखत संपन्न झाली. ही मुलाखत डॉ. लीना जावकर यांनी घेतली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी सोशल मीडियाला दिल्या जाणाऱ्या अवास्तव महत्वाबद्दल चिंता व्यक्त करत त्यावर योग्य सेन्सरशिप असावी, असे परखड मत व्यक्त केले.

या संवादादरम्यान गार्गी फुले-थत्ते यांनी आपले आयुष्य, अनुभव आणि कलाक्षेत्रातील प्रवास उलगडून सांगितला. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या म्हणून जन्माला आल्यामुळे समाजाकडून येणाऱ्या अपेक्षा, दबाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक संघर्षांबाबत त्यांनी अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. घरातील सामाजिक व वैचारिक वातावरण, मिळालेले संस्कार आणि त्याचा संपूर्ण जीवनावर झालेला परिणाम यावर प्रकाश टाकताना त्यांनी, “कलाकाराने जमिनीशी नातं जपणं आणि माणूस म्हणून प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं आहे,” असे ठाम मत व्यक्त केले.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले जात असल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम समाजावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी सोशल मीडियावर योग्य व संतुलित सेन्सरशिप असणे आवश्यक आहे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. नाटक, दूरदर्शन व चित्रपट या तिन्ही माध्यमांतील अभिनयातील फरक स्पष्ट करताना, प्रत्येक माध्यमात कलाकाराला पूर्णतः झोकून देऊन काम करावे लागते, असे त्यांनी सांगितले.
कलाक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगताना त्यांनी, “आपण कोणाची मुलगी किंवा मुलगा आहोत, यापेक्षा आपल्या कष्टांना, शिक्षणाला आणि गुरूंना अधिक महत्त्व द्या,” असा मोलाचा सल्ला दिला. ज्यांच्यात सृजनशीलता आहे, त्यांनी निर्भीडपणे या क्षेत्रात पाऊल टाकावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी त्यांनी “तुला पाहते रे”, “सावित्रीबाई जोतीराव फुले” यांसारख्या लोकप्रिय मालिकांतील आपल्या भूमिका, त्यामागील तयारी आणि अनुभव याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थित तरुणांनी स्त्रीपात्रांचे आदर्श, अभिनयातील सूक्ष्म बारकावे, भूमिकांची निवड यांसह विविध प्रश्न विचारून या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेतले. एकूणच हा संवाद उपस्थितांसाठी, विशेषतः तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, प्रमुख वक्ते यजुर्वेंद्र महाजन, संजीव करपे, संस्थेचे संचालक मंडळ, शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, सचिव महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, जीवनगौरव पुरस्कारप्राप्त प्रकाशजी राजेशिर्के, उद्योजक प्रदीप निकम, प्रशांत निकम, अंजलीताई चोरगे, युगंधराताई राजेशिर्के, पूजाताई निकम, तसेच बंधू पाकळे, मनोहर महाडिक, रज्जाक शेख यांच्यासह कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














