WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

लोकशाही मार्गाने स्वतंत्र कोकण राज्यासाठी लढा उभारणार : संजय कोकरे


लोकशाही मार्गाने स्वतंत्र कोकण राज्यासाठी लढा उभारणार : संजय कोकरे

कोकण राज्य अभियानाची सुरुवात

चिपळूण : कोकणातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय परिस्थितीचा सखोल विचार करून कोकणी जनतेला स्वतःची ओळख, हक्क, स्वाभिमान व न्याय मिळवून देण्यासाठी ‘कोकण राज्य अभियान’ सुरू करण्यात आल्याची माहिती स्वतंत्र कोकण अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे होतील, अशी कोणतीही भीती निरर्थक असून ही मागणी केवळ आपल्या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उचललेले एक सकारात्मक पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन झाले तरी त्यामध्ये कोकणावर अन्यायच झाल्याची भावना कोकरे यांनी व्यक्त केली.

कोकणातील केवळ दहा टक्के शासकीय सेवेत कोकणी माणूस असून उर्वरित पदांवर बाहेरील भागातील व्यक्ती कार्यरत आहेत, ही कोकणासाठी शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र कोकण राज्य झाल्यास फक्त कोकणी माणूसच कोकणी माणसाचे भवितव्य ठरवेल, अशी व्यवस्था निर्माण होईल आणि ही भूमिका सर्वच क्षेत्रातील विकासासाठी लागू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे अभियान अराजकीय स्वरूपाचे असून नवीन विचार म्हणून अनेक सुजाण नागरिक त्यास स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणवासी तरुणांसह सर्वच क्षेत्रांतील व्यक्ती या अभियानाला पाठिंबा देत असल्याने या चळवळीचे भवितव्य उज्वल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी अभियानाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय सुर्वे (सावर्डे) यांची, तर नेतेपदी अब्दुल कादीर चिलवान (चिपळूण) व सुभाष राणे यांची निवड जाहीर करण्यात आली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!