चिपळुणात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
➡️ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
➡️ महायुतीच्या प्रचाराला मिळणार बूस्टर डोस
➡️ भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी
➡️ अनेकांचा होणार पक्षप्रवेश
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची बुधवार, दिनांक २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा जिल्ह्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांची एकमेव जाहीर सभा असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या जाहीर सभेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते प्रशांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यादव यांच्या नेतृत्वाखाली सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून, प्रचारासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

या सभेला माजी मुख्यमंत्री, खासदार ना. नारायण राणे, पालकमंत्री ना. उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी चिपळूण तालुक्यात शिवसेना-भाजप युती झाली असून, जिल्हा परिषदेसाठी भाजपचे ३ व शिवसेनेचे ६ उमेदवार पंचायत समितीसाठी भाजपचे ७ व शिवसेनेचे ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चिपळूण पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार युतीच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून, जिल्हा परिषदेसाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

याबाबत बोलताना भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची ही सभा महायुतीच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेमुळे भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. सभेसाठी १० हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती अपेक्षित असून, त्या दृष्टीने भव्य मंडप उभारण्यात आला आहे. अनेक जण भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.”
या जाहीर सभेमुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ मिळेल आणि निवडणुकीत युतीला निश्चित यश मिळेल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.












