प्रा. डॉ. राजकुमार पवार यांना पीएच.डी.
खेड : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील माहिती तंत्रज्ञान (Information Technology) विभागातील प्राध्यापक डॉ. राजकुमार कलावती भिमराव पवार यांनी थडोमल शाहाणी अभियांत्रिकी महाविद्यालय, वांद्रे येथील संशोधन केंद्रातून, मुंबई विद्यापीठाशी संलग्न, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. हे यश त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
डॉ. पवार यांनी “डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतीय कृषी संशोधन वृद्धिंगत करणे” या विषयावर आपले पीएच.डी. संशोधन पूर्ण केले आहे. डीप लर्निंग हे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले, वेगाने प्रगती करणारे आणि अग्रगण्य संशोधन क्षेत्र मानले जाते. त्यांच्या संशोधनामध्ये डीप लर्निंगच्या प्रगत तंत्रांचा वापर करून भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादनक्षमता, निर्णय प्रक्रिया तसेच संशोधन कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. हा विषय राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या १६ वर्षांहून अधिक काळ माहिती तंत्रज्ञान संगणक विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पवार यांनी अध्यापन, संशोधन व शैक्षणिक मार्गदर्शनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये प्रतिष्ठित जर्नल्स व परिषदांमध्ये प्रकाशित चार संशोधन निबंध तसेच एक नोंदणीकृत पेटंट यांचा समावेश असून, हे त्यांच्या नाविन्यपूर्ण व उपयोजित संशोधनाची साक्ष देतात. डॉ. पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (डॉ. BATU), लोणेरे येथील माजी विद्यार्थी असून, माजी विद्यार्थ्यांच्या समूहाचे सक्रिय सदस्य आहेत. या समूहाच्या माध्यमातून ते विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजासाठी सातत्याने योगदान देत आहेत.
पीएच.डी. व्यतिरिक्त, डॉ. पवार यांनी स्प्रिंगर नेचर (Springer Nature) या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तक प्रकरण (Book Chapter ) तसेच डीप लर्निंगवरील एक पुस्तक (ISBN क्रमांकासह) लिहिले असून, ते ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. या प्रकाशनांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व डीप लर्निंग क्षेत्रातील त्यांची संशोधक व लेखक म्हणून ओळख अधिक दृढ झाली आहे. महाविद्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.











