दादर थांबा पूर्ववत करावा!
खेड भाजपकडून कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन
खेड : रत्नागिरी–दादर पॅसेंजर रेल्वेचा दादर येथील थांबा रद्द करून तो दिवा स्थानकापर्यंत मर्यादित केल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
कोकण रेल्वे हे स्वप्न माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी साकार केले. या रेल्वेमुळे कोकणातील प्रवाशांना अल्प खर्चात मुंबईत, विशेषतः दादरपर्यंत सहज प्रवास करता येत होता. पूर्वी केवळ ३५ रुपयांत दादर गाठणाऱ्या प्रवाशांना आता या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी–दादर पॅसेंजरचा दादर येथील थांबा काढून दिव्यापर्यंत मर्यादित करण्यात आला असून, त्याच मार्गावर दादर–गोरखपूर गाडी सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हा निर्णय कोकणवासीयांवर अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करत, दादर थांबा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
या वेळी भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव खेडेकर, नगरसेवक तथा गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, युवा मोर्चा सरचिटणीस ऍड. मिलिंद नांदगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, आशाताई सनगरे, सिद्धेश पाटणे, सिकंदर बांगी, सर्वेश पवार, प्रदीप भोसले, अक्षय सनगरे, तुषार पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











