WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार!


 कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार!

पिंपळी–नांदिवसें रस्त्यावरील पूल कोसळल्याचा फटका

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पिंपळी–नांदिवसें रस्त्यावरील दोन्ही पूल कोसळून आज दोन महिने पूर्ण झाले असले तरी, या पुलांच्या पुनर्बांधणीसंदर्भात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) या कामाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र दोन महिन्यांच्या कालावधीत MIDC कडून प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झाल्याने गाणे – खडपोलीतील उद्योग व कामगारवर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गंभीर बाब म्हणजे कामगार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार उभी राहिली आहे.

पूल कोसळल्यामुळे मोठ्या वाहनांची, कंटेनर व मालवाहतूक वाहने यांची ये-जा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे MIDC परिसरातील अनेक उद्योगांमध्ये कच्चा माल वेळेवर पोहोचत नसल्याने उत्पादन बंद पडले आहे. परिणामी कारखानदारांना कामगारांना काम देणे अशक्य झाले असून काही कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. या स्थितीचा सर्वाधिक फटका महिला कामगारांना बसला असून बेरोजगारीचे संकट गडद झाले आहे.

MIDC प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे. मात्र, दोन महिन्यांनंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने जनतेच्या आणि उद्योग क्षेत्राच्या सहनशीलतेचा अंत होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे.

“जर MIDC प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर कारखानदार व कामगारांसह MIDC कार्यालयासमोर ठिय्या बेमुदत आमरण आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मुराद अडरेकर यांनी दिला आहे.

या गंभीर प्रश्नाकडे MIDC तसेच जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी त्वरित हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही अडरेकर यांनी केली आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!