WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भारताच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलूया- प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर


भारताच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलूया- प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा

रत्नागिरी : विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांची भूमिका व योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपले काम जर आपण सर्वोच्च पातळीवर, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले, तरच विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकते. आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण उत्तम प्रकारे पार पाडल्या पाहिजेत, तरच हे शक्य होईल, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

जवाहर क्रीडांगणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले की, स्वातंत्र्यदिन आणि आपले कर्तव्य विसरता कामा नये. स्वातंत्र्यदिन साजरा करताना हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक सैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान विसरता कामा नये. या सर्व ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यवीरांना आपण मनःपूर्वक कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूया. आज आपल्याला “देश प्रथम” ही भावना आणि “समाजहित प्रथम” ही मूल्ये अंगीकारण्याची गरज आहे.

मुख्य इमारतीत गणित विभाग, आय.टी. आणि महिला विकास कक्षाचे भित्तिपत्रकाच्या अनावरण करण्यात आले. अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय एनएसएस युनिटच्या मशाल या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मंचावर प्राचार्य डॉ. साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. सुप्रिया टोळ्ये यांनी केले. सौ. विस्मया कुलकर्णी यांनी आभार मानले.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!