‘या जागेच्या आवारात कचरा टाकणारा दोन बापाचा‘
चिपळूण : शहरातील उक्ताड ते गुहागरनाका दरम्यान रस्त्यालगत उभारण्यात आलेला एक अनोखा फलक सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. उघड्यावर कचरा फेकणाऱ्या लोकांच्या त्रासाला कंटाळलेल्या संबंधित जागामालकाने अखेर एक हटके आणि खोचक उपाय शोधला असून, त्याने लावलेला फलक येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फलकावर मोठ्या अक्षरात लिहिले आहे – “या जागेच्या आवारात कचरा टाकणारा दोन बापाचा… आता टाक कचरा!”
या वाक्यरचनेमुळे अनेक जण क्षणभर थांबून फलक वाचतात आणि त्यानंतरच पुढे जातात. त्यामुळे हा फलक सध्या परिसरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
उक्ताड ते गुहागरनाका या मार्गावर काही लोकांकडून वारंवार उघड्यावर कचरा टाकला जात होता. त्यामुळे परिसर अस्वच्छ होत होता आणि जागा मालकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. वारंवार समज देऊनही काहींनी सवय बदलली नाही. अखेर कंटाळलेल्या जागामालकाने लोकांना लाज वाटावी आणि कचरा टाकण्यापूर्वी दोनदा विचार करावा, यासाठी हा उपरोधिक फलक लावण्याची कल्पना अमलात आणली.
या फलकाचा परिणामही हळूहळू दिसू लागला आहे. अनेक जण फलक वाचून हसतात, काही जण त्याचा फोटो काढतात, तर काही जण कचरा टाकण्याचा विचारच सोडून देतात. त्यामुळे परिसरात कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
दरम्यान, कोणाच्याही खासगी जागेत कचरा टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव करून देणारी टीपही या फलकावर देण्यात आली आहे. त्यामुळे हा फलक केवळ विनोदी किंवा खोचक नसून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणारा ठरत आहे.
एकंदरीतच, चिपळूण–गुहागर मार्गालगत लावण्यात आलेला हा अनोखा फलक सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा एक वेगळा प्रयत्न म्हणूनही त्याची चर्चा होत आहे.












