WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

प्रशासनाचे दुर्लक्ष : जामदा–काजिर्डा धरणग्रस्त दिव्यांग १ मे रोजी उपोषण छेडणार


प्रशासनाचे दुर्लक्ष : जामदा–काजिर्डा धरणग्रस्त दिव्यांग १ मे रोजी उपोषण छेडणार

राजापूर : तालुक्यातील जामदा–काजिर्डा धरण प्रकल्पामुळे ८ ते १० दिव्यांग बांधवांच्या जमिनी संपादित होत असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सर्व सुविधांसह एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात दिव्यांग बांधव अशोक रामचंद्र पवार यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देत येत्या १ मे (कामगार दिन) रोजी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते स्वतः १०० टक्के शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून त्यांची पत्नीही दिव्यांग आहे. गावातील एकूण ८ ते १० दिव्यांग व्यक्तींची संपूर्ण मालमत्ता जामदा–काजिर्डा धरण प्रकल्पामुळे बाधित होत आहे. हा प्रकल्प पाटबंधारे विभाग, कापसाळ (चिपळूण) यांच्या अधिपत्याखाली असून कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांच्या कार्यालयाकडे पुनर्वसनासंदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दिव्यांग बांधवांची प्रमुख मागणी म्हणजे, त्यांचे पुनर्वसन जंगलात विखुरलेल्या ठिकाणी न करता एकाच ठिकाणी सर्व सोयी-सुविधांसह करण्यात यावे. तसेच जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी, बुडीत क्षेत्रातील जमिनीला औद्योगिक दराप्रमाणे भरपाई द्यावी, फळझाडे व वनझाडांचे सरसकट मूल्यांकन करावे, दिव्यांगांना विशेष सवलती देण्यात याव्यात, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय प्रकल्पग्रस्त दाखला देताना कोणत्याही अटी-शर्ती लागू न करता तो तत्काळ द्यावा, दिव्यांग तरुणांचे शासकीय सेवेत पुनर्वसन करावे किंवा त्यांना अर्थसहाय्य करावे, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास १ मे रोजी उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोक पवार यांनी दिला आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!