चिवेली विद्यालयाला क्रीडा विभागाचा दणका
🔴 व्यायामशाळा अनुदान अनियमितता प्रकरण भोवले
🔴कायमस्वरूपी केले अपात्र
🔴माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांचा पाठपुरावा
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील आदर्श विद्यामंदिर या संस्थेला व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतील गंभीर अनियमिततेप्रकरणी क्रीडा विभागाच्या सर्व भविष्यकालीन अनुदान योजनांसाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्तांच्या मान्यतेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांनी केली आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांना अधिकृत आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी तक्रारी केली होती. साळुंखे यांनी संबंधित संस्थेने व्यायामशाळा बांधकामासाठी मिळालेल्या शासन अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन संचालनालयाने चौकशीचे आदेश दिले होते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार संबंधित संस्थेला सन २०१४-१५ मध्ये व्यायामशाळा बांधकामासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सन २०१५-१६ मध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत रु. ७ लाख इतके अनुदान वितरित करण्यात आले होते. नियमानुसार एका वर्षाच्या आत निधी विनियोगाचा लेखापरीक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते.
मात्र, संस्थेकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. पुढील चौकशीसाठी विभागीय उपसंचालक, कोल्हापूर यांना आदेश देण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार संबंधित ठिकाणी व्यायामशाळेचे कोणतेही प्रत्यक्ष बांधकाम झाल्याचे आढळून आले नाही. तसेच शासनाची दिशाभूल करून अनुदानाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या निष्कर्षांच्या आधारे संचालनालयाने कठोर भूमिका घेत आदर्श विद्यामंदिर या संस्थेला क्रीडा विभागाच्या सर्व अनुदान योजनांसाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांना पाठविण्यात आला असून संबंधित संस्थेस ही बाब कळवून अहवाल संचालनालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, तक्रारदार विद्याधर साळुंखे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू असून शासन अनुदानाच्या पारदर्शक वापराबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.











