चिपळूणवासियांच्या उत्साहातून ऊर्जा मिळते : आ. भास्कर जाधव
रोटरॅक्ट चिपळूण फन फेअरला ३० वर्षांची परंपरा
चिपळूण : रोटरॅक्ट क्लबच्या फन फेअरला आज 30 वर्षे पूर्ण झाल्याचे समाधान वाटते. हा महोत्सव अधिक तरुण झाल्याचा विशेष आनंद वाटत असून चिपळूणवासीयांच्या उत्साहातून आपल्याला नेहमीच ऊर्जा मिळते, असे मत व्यक्त करत शिवसेना उबाठाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्वही अधोरेखित केले.

शहरातील बावशेवाडी येथील मैदानावर गेले अनेक वर्षे सुरू असलेल्या रोटरॅक्ट क्लब आयोजित फन फेअरचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते, तर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. फीत कापून या फन फेअरचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. अल्ताफ सरगुरोह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, सन 1997 पासून फन फेअर सुरू असून या माध्यमातून चिपळूणवासीयांचे सातत्याने मनोरंजन होत आहे. यंदा या फन फेअरचे तिसावे वर्ष असून विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून आमदार भास्करशेठ जाधव यांच्या एकाच हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून कोरोना काळात कामथे उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच महापुराच्या काळातही क्लबने मोलाची मदत केली. सामाजिक कार्यात रोटरी क्लब नेहमीच आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार भास्करशेठ जाधव यांनी फन फेअरला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ. सुवर्णाताई भास्कर जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, सतीशआप्पा खेडेकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के, माजी नगरसेवक मिलिंद कापडी, नगरसेवक विकी नारळकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबू तांबे, राजा दळी, नगरसेविका उमा देसाई, गणेश आग्रे, सुयोग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वीकृत नगरसेवक फैसल कासकर व प्रशांत देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
फन फेअरच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, प्रसाद सागवेकर, राहुल रेडीज, शैलेश टाकळे, मंदार आवले, मनोज जैन, बाळा अंबुर्ले आदींनी परिश्रम घेतले.












