कार कोसळली 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात : एकाचा मृत्यू
वालोपे येथे भीषण अपघात, दोन चिमुकल्यांसह पाच जखमी
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे भीषण कार अपघात झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन लहान बालकांसह पाच जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 4.25 वाजण्याच्या सुमारास कार क्रमांक एमएच 08 बीई 1742 ही मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होती. वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या अपघातात संजय जाधव (रा. मार्कंडी, चिपळूण) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाला पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील जखमींमध्ये अप्रीन सावंत (वय 44, रा. मुंबई), रिधा मोडक (वय 28, रा. मुंबई), उजर मुल्ला (वय 9, रा. चिपळूण), रिया मुल्ला (वय 36, रा. चिपळूण) आणि आईन मुल्ला (वय 4, रा. चिपळूण) यांचा समावेश आहे. जखमी सर्वांवर सध्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.












