चिपळूण तालुक्यातील अपघाती घटना
🔴आंब्याच्या झाडावरून पडून प्रौढाचा मृत्यू
सावर्डे : आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या एका प्रौढाचा खाली पडून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश पांडुरंग जाधव (वय ५२, रा. डेरवण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश जाधव हे शनिवारी आंबे काढण्यासाठी झाडावर चढले होते. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते झाडावरून थेट जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
घटनास्थळी उपस्थितांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डेरवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
🔴रेल्वेतून पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथे रेल्वेतून पडून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ओंकार विजय गुरव (वय १९, रा. संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा आपल्या बहिणीसोबत गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होता. कळंबस्ते परिसरात रेल्वे प्रवासादरम्यान अचानक त्याचा तोल गेल्याने तो रेल्वेतून खाली कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
🔴खेरशेत येथे दुचाकीची कारला धडक; दोघे जखमी
सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील खेरशेत येथे दुचाकीने कारला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दुचाकी चालक प्रशांत संजय सावंत (रा. तोंडली) याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद दीपक सुरेश यादव (रा. ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यादव हे त्यांच्या ताब्यातील कारने मुंबई-गोवा महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, ते खेरशेत येथे आले असता दुचाकी चालक प्रशांत सावंत हा अचानक महामार्गावरील डायव्हर्शनमधून भरधावपणे आला आणि त्याने यादव यांच्या कारला धडक दिली.
या अपघातात दुचाकी चालक प्रशांत सावंत तसेच दुचाकीच्या मागे बसलेले कुणाल एकनाथ शिंदे (रा. कुशिवडे) हे दोघेजण जखमी झाले. अपघातात कार व दुचाकीचे नुकसान झाले असून सावर्डे पोलीस अधिक तपास करत आहेत.
🔴दिव्यांग दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू
चिपळूण : तालुक्यातील कापसाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपंग दुचाकीस्वाराचा भीषण अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. महेश अरुण गुडेकर (वय ५०, रा. कापसाळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गुडेकर हे त्यांच्या अपंग दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गाने रावतळे ते कापसाळ असा प्रवास करत होते. कापसाळ येथील एका दुचाकी शोरूमजवळ ते आले असता त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी भरधाव वेगात असल्याने वाहन रस्त्यावर घसरत गेले आणि महामार्गावरील दुभाजकावर जोरात आदळले. या भीषण अपघातात महेश गुडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबतची फिर्याद त्यांचे भाऊ राजेंद्र अरुण गुडेकर (वय ५२, रा. काविळतळी) यांनी दिली आहे.
महेश गुडेकर हे शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.












