‘सह्याद्री’चे चित्र झळकणार पुण्यात!
प्रसिद्ध कला प्रदर्शनासाठी प्रा. प्रदीपकुमार देडगे यांच्या चित्राची निवड
पुणे / चिपळूण : कलेच्या क्षेत्रातील अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे मानले जाणारे ३८ वे अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती कला प्रदर्शन २०२६ लवकरच पुण्यात संपन्न होणार असून, या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथील प्रा. प्रदीपकुमार देडगे यांच्या चित्राची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कलावर्तुळात त्यांचे कौतुक होत आहे.

पुण्यातील टिळक रोड येथील टिळक स्मारक मंदिरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हे भव्य कला प्रदर्शन आयोजित केले जाते. देशभरातील नामांकित तसेच उदयोन्मुख कलाकारांची चित्रे, शिल्पे आणि लाईव्ह स्केचेस या प्रदर्शनात सादर केली जातात. यंदाच्या ३८ व्या आवृत्तीसाठी देशभरातून हजारो प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातून अत्यंत काटेकोर निवड प्रक्रियेनंतर मोजक्याच कलाकृतींची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये प्रा. देडगे यांच्या कलाकृतीने स्थान मिळवले आहे.
या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या कलाकारांना १९ जानेवारी २०२६ पर्यंत मूळ चित्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. प्रदर्शनादरम्यान केवळ चित्रांचे सादरीकरणच नव्हे, तर लँडस्केप पेंटिंगची थेट प्रात्यक्षिके (Live Demonstrations) तसेच विशेष कला कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (TMV) आणि टिळक स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते.
प्रा. प्रदीपकुमार देडगे हे सध्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथे कार्यरत असून, त्यांच्या या निवडीमुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुख्य सोहळ्यात देशातील दिग्गज कलाकारांच्या कलाकृतींसोबत त्यांचे चित्र प्रदर्शित होणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, श्री. अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापकवृंदांनी प्रा. प्रदीपकुमार देडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.












