लोटेतील केमिकल कंपन्यांतील वारंवार स्फोटांची स्वतंत्र चौकशी करा!
कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीची मागणी
मुंबई : लोटे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या स्फोट आणि आगीच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने केली आहे. यासंदर्भात समितीचे नेते तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारकडे निवेदन दिले आहे.
शुक्रवारी लोटे एमआयडीसीमधील डॉ. खान केमिकल्स या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाले. जखमी कामगारांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेबाबत संबंधित कंपनीकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली असल्याचे दलवाई यांनी म्हटले आहे.
लोटे एमआयडीसी परिसरात केमिकल कंपन्यांमधील अपघात स्थानिकांसाठी नवीन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०२१ पासून अनेक गंभीर घटना घडल्या असून Gharada Chemicals येथे झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर Pushkar Chemicals, Supriya Chemicals, Vinati Organics आणि Divine Chemicals या कंपन्यांमध्येही स्फोट किंवा आगीच्या घटना घडल्या असून अनेक कामगार जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे Dr. Khan Chemicals मधील स्फोट ही दुर्दैवी असली तरी नवीन घटना नाही, असे त्यांनी नमूद केले.
दलवाई यांनी सांगितले की, या कंपनीत इथेनॉल या कच्च्या मालाचा वापर करून Ethyl Silicate (TEOS) आणि Pre-Hydrolyzed Ethyl Silicate ही रसायने तयार केली जातात. या प्रक्रियेत निर्माण होणारा अल्कोहोल आधारित कचरा अत्यंत घातक असून तो Taloja MIDC येथील इन्सिनरेटरमध्ये नष्ट करणे आवश्यक असते. मात्र संबंधित कंपनी हा कचरा स्थानिक विक्रेत्यांमार्फत अनियमित पद्धतीने नष्ट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोटे एमआयडीसी परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची गंभीर परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. फॅक्टरी इन्स्पेक्टरचे कार्यालय Kolhapur येथे असल्याने अपघातानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो. गॅस गळतीसारख्या गंभीर घटनांनंतरही प्रशासन वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, PFAS हे अत्यंत घातक रसायन तयार करणारी Laxmi Organics ही कंपनी बंद करण्यासाठी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीमार्फत आंदोलन सुरू असल्याचेही दलवाई यांनी सांगितले. PFAS हे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे रसायन असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. लोटे एमआयडीसीतील घटनांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि त्या समितीत स्थानिक नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते व तज्ज्ञांचा समावेश करावा. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोकणातील पर्यावरण आणि स्थानिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच झिरो डिस्चार्जचे नियम न पाळणाऱ्या सर्व कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे. या प्रश्नावर स्थानिक नागरिकांना एकत्र करून संघर्ष सुरू ठेवणार असल्याचेही दलवाई यांनी स्पष्ट केले.












